सातारा शहरात सदरबझार परिसरात मागील काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया साथीचे थैमान सुरु आहे. मात्र, यामध्ये काही रुग्णांचा करोनासह डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असूनही, त्यांना फप्फुसाला सूज व कमरेखाली थकवा जाणवत आहे. या आजाराचे नेमके निदान होत नसल्याने अनेकजण सध्या या अनोख्या आजाराने त्रस्त आहेत. यामुळे आता आरोग्य यंत्रणेसमर नवे आव्हान निर्माण झाल्याचे दिसत आहे.
सदरबझार परिसरात काही दिवसांपासून डासांचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे तिथे डेंग्यू, मलेरियासह, चिकनगुनियामुळे अनेकजण आजारी पडले आहेत. अनेकजण खासगी डॉक्टर्सकडून उपचार घेत असून एकीकडे करोनाचा संसर्ग आणि दुसरीकडे या साथीच्या आजारांनी सदरबझारकर सध्या हैराण झाले आहेत.
परिसरात डासांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर असून पालिकेकडून डासांची वाढ रोखण्यासाठी फवारणी केली जात आहे. मात्र, अजून उपाय योजना करण्याची आवश्यकता तिथे निर्माण झाली आहे. पालिकेने या परिसरात वाढलेल्या साथीच्या आजारांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच आरोग्य यंत्रणांनी तातडीने या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाय योजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
अंगदुखी, ताप, थंडी अशी लक्षणे –
डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियामुळे आजारी पडलो असेन म्हणून नागरिक अगदी करोनाच्या आरपीटीसीआर या तिन्ही आजारांच्या टेस्ट करत आहेत. सर्व चाचणी अहवाल नकारात्मक येत आहेत. लक्ष्मी टेकडीवरील व जवान हौसिंग सोसायटीतील सुमारे २५ घरातील नागरिकांच्या या चाचण्या नकारात्मक आल्या आहेत. तरी देखील ते सध्या अनोख्या आजाराने त्रस्त आहेत. अंगदुखी, ताप, थंडी अशी लक्षणे असून ती कमी होत नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.