– विजय पाटील
सातारा जिल्ह्यात पावसाने रौद्ररूप धारण केल्याने दरड कोसळून ढिगाऱ्याखाली चार घरे दबली गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये १४ लोक अडकली असल्याची भीती व्यक्त होत आहे. ही मोठी दुर्घटना काल रात्रीच्या सुमारास पाटण तालुक्यातील मोरणा विभागात खालचे आंबेघर येथे घडली. याचबरोबर कोयनानगर, मिरगाव येथेही दरडी कोसळल्या आहेत.
हा भयानक दुर्घटना घडल्याचे निदर्शनास येताच स्थानिक लोक व प्रशासनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. परंतु, तूफान पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व जिल्हाधिकारी शेखर सिंह हे देखील घटनास्थळाकडे निघाले आहेत.
वसंत कोळेकर, ज्ञानजी कोळेकर, विनायक कोळेकर व रामचंद्र कोळेकर अशा चार शेतकऱ्यांची घरं दरड कोसळून ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने घटनास्थळी एकच हाहाकार माजला आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे साताऱ्याहून तातडीने घटनास्थळाकडे निघाले असता गोकुळफाटा पूल पाण्याखाली गेलेला असल्याने ते तेथे अडकले आहेत. तर, जिल्हाधिकारी शेखर सिंह हेही घटनास्थळाकडे निघाले आहेत.