कराड : सीमाशुल्क (कस्टम) विभाग आणि दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल होण्याची भीती घालून दोघांनी कराडमधील महिला डॉक्टरची १६ लाख २५ हजार १०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. दिल्ली विमानतळावर पकडलेल्या साहित्यात तुमच्या नावाची १६ पारपत्र (पासपोर्ट) आणि नशीले पदार्थ (ड्रग्ज) सापडल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत डॉ. प्रणोती रुपेश जडगे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कराडमधील डॉ. प्रणोती जडगे कृष्णा रुग्णालयात कार्यरत आहेत. २० सप्टेंबर रोजी सकाळी त्यांच्या भ्रमणध्वनीवर (मोबाइल) अज्ञात क्रमांकावरून बोलणाऱ्यांनी आपण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंट्रोल रूममधून सीमाशुल्क अधिकारी सुमित मिश्रा बोलत असून, तुमच्या नावाचे दिल्ली ते मलेशियासाठीचे पार्सल विमानतळावर अडवून ठेवले आहे. त्यामध्ये १६ पारपत्र, ५८ एटीएम कार्ड, १४० ग्रॅम ड्रग्ज असून, हा गुन्हा नोंदलेल्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी बोला, असे मिश्रा नामक व्यक्तीने सांगून वसंतकुंज पोलीस ठाण्यातील सुनीलकुमार या व्यक्तीशी संपर्क करून दिला.

हेही वाचा – Dhananjay Munde : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले,”मी…”

हेही वाचा – Bharat Gogawale : भरत गोगावले यांचा रायगडच्या पालकमंत्रिपदावरचा दावा कायम, आदिती तटकरेंशी पुन्हा संघर्ष?

सुनीलकुमारने डॉ. जडगे यांना गुन्हा दाखल होण्याची भीती घालून न्यायालयाने तुमची सर्व बँक खाती गोठविण्याचे आदेश दिल्याचे सांगत दिल्ली न्यायालयाच्या नावे असलेल्या आदेशाची एक प्रत डॉ. जडगे यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवून दिली. त्यानंतर सुनीलकुमारने व्हिडीओ कॉल करून तुम्हाला यातून निर्दोष बाहेर पडायचे असल्यास तुमच्या बँक खात्यातील सर्व रक्कम रिझर्व बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करण्यास सांगितले. आणि सर्व प्रकाराने घाबरलेल्या डॉ. जडगे यांनी त्यांच्या बँक खात्यातील १६ लाख २५ हजार १०० रुपये त्या बँक खात्यावर ऑनलाइन हस्तांतरित केले. मात्र, त्यानंतर सुनीलकुमार व सुमित मिश्राचे भ्रमणध्वनी बंद असल्याने आपली फसवणूक झाल्याचे डॉ. जडगे यांच्या निदर्शनास आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara fraud with a woman doctor from karad by pretending to be a customs officer ssb