देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. सामान्य नागरिकांपासून ते करोना योद्ध्यांसह राजकीय नेते व मंत्री देखील करोनाच्या विळख्यात सापडत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे सहकार मंत्री व सातारा जिल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा शुक्रवारी रात्री कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रात्री उशीरा त्यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बाळासाहेब पाटील यांची तब्येत ठीक आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात आज अखेर ७ हजार ९२ करोनाबाधीत आहेत. शुक्रवारी रात्री सातारा जिल्ह्यात ३४१ नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण कोरोनाबधितांचा संख्या ७ हजार ९२ झाली आहे. जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या ३ हजार ३९७ तर दिवसभरात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८ होती. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण २१४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन मागील चार महिने ते परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यात त्यांच्या कराड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत.