वाई: सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे.सातारा जिल्हा हा पूर्वीसारखा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही असे आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शक्ती प्रदर्शन केले. शिरवळ खंडाळा कवठे येथे किसन वीर पुतळ्यास अभिवादन केले.पाचवड सातारा येथेही त्यांचे जल्लोषी स्वागत झाले. शेंद्रे कारखान्यावरील कै. आमदार अभयसिंहराजे भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगम या समाधीस्थळी अभिवादन करुन दर्शन घेतले. तसेच पी. डी. पाटील यांच्या स्मारकालाही भेट देऊन अभिवादन केले. आमदार शशिकांत शिंदेंच्या या शक्ती प्रदर्शनावरुन सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी भाष्य केलं .
निवडणुका म्हटले की कोणाचे तरी आव्हान असतेच. मात्र साताऱ्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे आमची मागणी होती की, भारतीय जनता पक्षाकडे साताऱ्याची जागा राहायला हवी. पूर्वी सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण आता तो राहील तसा राहिलेला नाही, हे आता स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट
भारतीय जनता पक्षाचे गाव पातळीवरील छोटे छोटे मोठे कार्यकर्ते आहेत. ज्यांना अजून पदेही मिळाले नाहीत. त्या सर्वांची अशी इच्छा होती की साताऱ्याची जागा भारतीय जनता पक्षाने लढवायचे आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र तो उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होईल.निवडणुका म्हटले की कोणाचे तरी आव्हान असतेच, मात्र पक्षाची ताकद वाढलेली असल्याने महायुतीची उमेदवारी भारतीय जनता पक्षालाच मिळायला हवी. अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर दिली.