कराड: कासारशिरंबे (ता. कराड) येथे ऊसतोड मजुरांनी शिकार करण्याच्या उद्देशाने लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या अडकला. ही बाब लक्षात आल्यानंतर गावच्या पोलीस पाटलांनी वनविभागात खबर दिली. यावर वनविभागाच्या पथकाने परिसरात शोधाशोध करून वन्य प्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच ऊसतोड मजुरांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, सापळ्यात अडकलेल्या बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकल्याने त्याचे प्राण वाचले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश बापूराव पवार, सुनील दिलीप पवार, विशाल दिलीप पवार, मिथून भाऊराव शिंदे, भिमराव बाबुराव पवार (सर्व रा. भालकी ता. भालकी, जि. बिदर, (कर्नाटक, सध्या ऊसतोड मजूर कासारशिरंबे ता. कराड) असे याप्रकरणी वन विभागाने गुन्हा नोंद केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन सापळे, तारेचा पिंजरा, लाकडी मूठ असलेली टोकदार लोखंडी सळई, तीन वाघरं, नायलॉन दोरी, क्लच वायरचा फास आदी शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याबाबत वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, कासारशिरंबे (ता. कराड) येथील मारुती संभाजी बोंद्रे यांच्या उसाच्या शेतात एक बिबट्या वन्यप्राणी सापळ्यात अडकला होता. मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर कासारशिरंबे गावचे पोलीस पाटील यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळतात तत्काळ वनक्षेत्रपाल, वनपाल व वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी घाव घेतली. या वेळी वरील उसतोड मजुरांकडे शिकारीचे साहित्य आढळले. याबाबत वन विभागाच्या पथकाने संशयितांकडे अधिक चौकशी केली असता शिकारीच्या उद्देशाने सापळा लावला असल्याचे समोर आले. त्यानंतर चौकशीअंती वनविभागाने या पाच संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara kasarshirambe leopard hunt attempt ssb