जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे केळघर (ता.जावली) येथे दरड कोसळल्यामुळे सातारा-महाबळेश्वर वाहतूक गुरुवारी विस्कळीत झाली होती. दरम्यान, जिल्ह्य़ात आणि कोयना धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असून गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणात ५९.२१ टीएमसी पाणी साठा झाला आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता एच.व्ही.गुणाले यांनी दिली. दरम्यान,
सातारा जिल्ह्य़ात गेल्या आठवडय़ापासून संततधार सुरू आहे. महाबळेश्वर, वाई, सातारा, पाटण भागातील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे. सातारा-महाबळेश्वर मार्गावर केळघरजवळ सकाळी जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळली. या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. प्रशासनाने तातडीने यंत्रणा रवाना करून मार्ग मोकळा केला व वाहतूक सुरळीत केली. महाबळेश्वरला वाईहून जाणाऱ्या वाहनांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून पाचगणीत थांबवून वाहतूक धिम्या गतीने केली होती. दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, सातारा जिल्ह्य़ाच्या पूर्वेस झालेल्या संततधार पावसाने उरमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे दोन वक्रदरवाज्यातून दोन हजार क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदी पात्राजवळच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. उरमोडीबरोबरच तारळी धरणातूनही दोन हजार ४४६ क्युसेक पाणी सोडले जात आहे.
आजअखेर झालेल्या पावसाने कोयना ६५ टक्के, तर धोम, कण्हेर, उरमोडी ही धरणे ८५ टक्के भरली आहेत. महाबळेश्वर येथे गेल्या २४ तासात ३५४ मि.मी.पावसाची नोंद झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा