कराड तालुक्यातील मलकापूर येथे घर विकण्याच्या वादातून ४३ वर्षांच्या इसमाने आई व भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी राकेश घोडके (वय ४३) याला अटक केली आहे.

मलकापूरमधील आझाद कॉलनीत जयश्री घोडके ( वय ६३) राहतात. जयश्री यांना दोन मुलं आहेत. राकेश (वय ४३) आणि  राजेश (वय ४०) अशी त्यांची नावे आहेत. राकेशने आईकडे घर विकण्याचा तगादा लावला होता. यावरुन घोडके कुटुंबात वाद होता. तर राजेश घोडके हे इस्लामपूर येथे भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत होते. त्यांची नुकतीच फलटण येथे बदली झाली होती. ते सोमवारी कामावर हजर होणार होते.

मात्र, सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास राकेशने राजेश व जयश्री यांच्यावर गुप्तीने वार केले. गुप्तीने आठ ते दहा वार केल्यानंतरही राकेश थांबला नाही. त्याने अंगणातील लोखंडी पाईप व बादलीनेही त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात मायलेकाचा मृत्यू झाला. यानंतर राकेशने पत्नीवरही हल्ला केला. यात ती देखील जखमी झाली. या प्रकारानंतर राकेश घराच्या अंगणातच बसून होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कराड शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सतीश जाधव आणि होमगार्ड शेडगे यांनी मोठ्या धाडसाने राकेशला अटक केली.

Story img Loader