वाई : मराठी विश्वकोश कार्यालयात साठून राहिलेली काही जुनी कागदपत्रे नष्ट करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, यातून संस्थेचे माजी अध्यक्ष व प्रमुख संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पू. रेगे यांच्या हस्ताक्षरातील नोंदी नष्ट होत असल्याचा संशय काहींनी व्यक्त केला तर अशा कुठल्याही महत्त्वाच्या नोंदी, कागदपत्रे संस्थेकडून नष्ट करण्यात येत नसल्याचा निर्वाळा विश्वकोश कार्यालयाकडून देण्यात आला आहे.
वाई येथे १९६१ पासून मराठी विश्वकोश मंडळाचे कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयातूनच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १९६१ ते १९९४ पर्यंत साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोशाचे अध्यक्ष व प्रमुख संपादक म्हणून काम पाहिले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी मराठी विश्वकोश निर्मितीसाठी राज्यभरातून वेगवेगळ्या विषयांतील विद्वानांकडून अद्ययावत नोंदी मिळवल्या गेल्या होत्या. या नोंदींवर पुन्हा काही अभ्यासकांनी काम करत त्यांच्या नव्या नोंदी तयार केलेल्या आहेत.
हेही वाचा : मराठा आरक्षण सल्लागार मंडळावर सुविधांचा वर्षाव; चार लाख मानधन, विमान प्रवास, २४ तास…
आज अशी हजारो कागद, हस्तलिखिते सध्या मंडळाकडे पडून आहेत. या शिवाय विविध फाइल्स, अन्य कागदपत्रे यांचाही मोटा ढिग आहे. या याऱ्या कागदपत्रांच्या साठवणुकीसाठी मोटी जागा अडून बसलेली आहे. तसेच त्यांच्या जतनाचा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हेच कागद संस्थेकडून नष्ट करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे मंडलाचे म्हणणे आहे. मात्र, या कामावर काहींनी आक्षेप घेत ही कागदपत्रे नष्ट न करण्याची मागणी केली आहे. मंडळांने मान्यवर लेखक, अभ्यासक, संपादक यांच्या नोंदी, हस्तलिखिते या अगोदरच वेगळ्या केलेल्या असून त्यावर नित्य संशोधनाचे कार्यही सुरू असते. हे महत्वाचे कागद, हस्तलिखिते संस्थेकडून अगोदरच जतन केले असल्याचे सांगितले आहे.
“मराठी विश्वकोशाच्या मागील अनेक वर्षांपासूनच्या वापरातील खुर्च्या, टेबल, कपाटे, जुन्या फाईल, जुने कागद, हस्तलिखिते नष्ट करण्याच्या सूचना पाच महिन्यांपूर्वी शासनाने दिलेल्या आहेत. जुन्या आणि महत्त्वाच्या नसलेल्या हस्तलिखित नोंदींमधील मजकूर आता छापील ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेला आहे. या छापील मजकुराचे हे हस्तलिखित कागद आहेत. हे हजारो जुने कागद सांभाळणे अवघड असून, त्यापासून अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांनाही धोका निर्माण होऊ शकतो. मंडळाकडून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पू. रेगे या अशा अन्य सर्व मान्यवरांची कागदपत्रे, हस्तलिखिते जतन करून ठेवलेली आहेत”, मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव शामकांत देवरे यांनी म्हटले आहे.