वाई : सातारा पालिकेच्या नवीन वाढीव हद्दीतील विकासकामांना प्राथमिक सोयीसुविधांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मिळण्यासाठी आज खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे भेट घेऊन प्रस्तावाद्वारे मागणी केली. या वेळी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते  ही भेट केवळ साताऱ्याच्या वाढीव भागाच्या विकासासाठी निधी मिळवण्यासाठी असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

 सातारा नगर परिषदेची हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे २१.०४ चौ.कि.मी. इतके क्षेत्र वाढ होऊन एकूण २९.१९ चौ.कि.मी. इतके झाले आहे. हद्दवाढ झालेल्या क्षेत्राचे संपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले असून या भागात प्राथमिक सोयी सुविधा पुरविण्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांचे अंदाजपत्रक पालिकेने केले आहे. त्याची एकूण किंमत रु.४,८५० लक्ष इतकी आहे.

हा भाग हा मूळ हद्दीपेक्षा  तिप्पट असून त्या भागातील सुमारे ६०३७३ इतक्या लोकसंख्येस पायाभूत सुविधा पुरविणे आर्थिकदृष्टय़ा पालिकेस शक्य नाही, त्यामुळे नव्याने हद्दीत आलेल्या भागामध्ये प्राथमिक सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या विभागाकडून अनुदान प्राप्त होते, त्याअंतर्गत सातारा पालिकेस रु. ४,८५० लक्ष इतका निधी मंजूर करावा, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन केली.