सातारा : कायम दुष्काळी खटावच्या ब्रिटिशकालीन नेर तलावात येथील तलावात नौकानयनाचा आनंद लुटता येणार आहे. गावाच्या यात्रेनिमित्त ही सोय करण्यात आली असून, पर्यटक, भाविक याचा आनंद घेत आहेत. नेर तलाव (फडतरवाडी, ता. खटाव) येथील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गुरू परंपरेतील संत राघवचैतन्य महाराजांच्या यात्रेनिमित्त धार्मिक व विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विशेष बाब म्हणजे ट्रस्टने यंदा यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी नेर तलावात आजपासून ११ फेब्रुवारीपर्यंत बोटिंग सफारीची सोय केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना वेगळा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
नेर तलावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी
या भागातील लोक ब्रिटिशकालीन नेर तलावास भेट देतात. माण खटाव या कायम दुष्काळी भागात या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने तलावात असलेले मुबलक पाणी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. या तलावाच्या उत्तरेकडे टेकडी असून, त्यावर शासनाचा ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा असलेले राघवचैतन्य महाराज मंदिर आहे. या ठिकाणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गुरू परंपरेतील संत राघवचैतन्य महाराज यांनी साधना केली होती. नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास येण्या-जाण्यासाठी थोडी वाट सोडता टेकडीला बेटाचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची कायम गर्दी होत असते.
यंदाच्या राघवचैतन्य यात्रेचे बोटिंग सफारी हे खास आकर्षण आहे. तरी यात्रेकरू शेतकरी, भाविक भक्त व पर्यटकांनी नेर तलाव सफारीचा आनंद लुटावा, असे आवाहन मठाधिपती स्वानंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत फडतरे आणि विश्वस्तांनी केले आहे.
६७७ एकरावर तलाव
सातारा-पंढरपूर या महामार्गाच्या उत्तरेला पुसेगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नेर परिसरात सुमारे ६७७ एकर क्षेत्रावर नेर तलाव आहे. येथे जाण्यासाठी नेर फाटा येथून नेर गाव व पुढे दोन किलोमीटर अंतरावर नेर तलाव व राघवचैतन्य मंदिर आहे. पुसेगाव-फलटण रस्ता, ललगुण येथूनही या ठिकाणाला भेट देता येते.