सातारा – राज्यसभेच्या महाराष्ट्रात दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला देण्याचे आम्ही यापूर्वीच कबूल केले आहे. याबाबत पक्षाची संसदीय समिती योग्य तो निर्णय घेईल. त्यामुळे एक जागा अजित पवारांच्या गटाला दिली जाईल, असा स्पष्ट निर्वाळा भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिला. फडणवीस यांच्या या घोषणेमुळे अजित पवारांनी दिलेल्या शब्दानुसार नितीन पाटील यांना राज्यसभेचे खासदार होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
पीयूष गोयल व उदयनराजे भोसले हे दोघेही लोकसभेवर निवडून गेल्याने भाजपच्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. दि. ३ सप्टेंबर रोजी या दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. उदयनराजेंच्या लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी नितीन पाटील यांना राज्यसभेचा खासदार करतो असा शब्द दिला होता. मात्र, भाजपच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीवर राज्यसभेवर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्या, असा ठराव केला होता. राज्यसभेची निवडणूक लागली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी भेट घेतली.
फडणवीस यांना अजित पवारांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली असता ते म्हणाले, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील दोन जागांपैकी एक जागा अजित पवार गटाला देण्याचे आम्ही यापूर्वी कबूल केले आहे. याबाबतची चर्चाही झाली आहे. त्यामुळे दोनपैकी एक जागा अजित पवार गटाला जाईल. फडणवीस यांनी स्पष्टपणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोरच ही भूमिका मांडल्याने नितीन पाटील यांच्या खासदारकीचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच अन्य कुणी ऐनवेळी उसळी मारली नाही, तर लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र असलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे ३ सप्टेंबर या दिवशी राज्यसभेचे खासदार होऊ शकतात.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील व त्यांचे समर्थक आवर्जून उपस्थित होते. येथे त्यांनी फडणवीस यांचे स्वागतही केले. यावेळी फडणवीस व मकरंद पाटील यांच्यात कानगोष्टीही झाल्या. त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी प्रभाकर घार्गे, डॉ. राजेंद्र सरकाळे, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, बाळासाहेब सोळस्कर, राजेश पाटील वाठारकर, सुनील खत्री उपस्थित होते.