साताऱ्याहून पंढरपूरकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावरील विखळे येथील मायणीजवळ मोटार आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. त्यामध्ये दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. सातारा-पंढरपूर राज्य महामार्गावर पंढरपूरकडे जाताना दुपारी चारच्या दरम्यान अपघात झाला.
सूरज राजाराम माळी (वय २७, रा. मायणी मानमोडी ता. खटाव) आणि संतोष किसनराव बिराजदार (४०, रा. सय्यदपूर, ता. देवणी, जि. लातूर) अशी मृतांची नावे आहेत. राजकुमार बिराजदार, ज्योतिराम धनाजी बिराजदार, दत्ता बिराजदार, महेश विठ्ठल झोळकुडे हे तरुण गंभीर जखमी झाले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुचाकीस्वार हे दुचाकीवरून (क्र. एमएच ११ सीएफ ८५१९) मायणीकडे येत होते. तर वाहन क्र. (एमएच १४ जीयू ६७९८) पंढरपूरच्या दिशेने निघालं होतं. देशमुख वस्तीनजीक छोट्याशा वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील अन्य चार जण गंभीर जखमी झाले. या अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान झाले. लातूरकडे निघालेले तरुण कोल्हापूरला जोतिबाच्या दर्शनासाठी गेले होते. अपघाताचा मोठा आवाज येताच परिसरातील वस्त्यांवरील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत अपघाग्रस्तांना मदत केली. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास करीत आहेत.