फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपद्वारे ओळख वाढवून भेटायला बोलवून लुटमार करणार्‍या टोळीचा सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी काजल प्रदिप मुळेकर (वय २८, थेऊर सध्या रा. सिंदवणेरोड, उरळीकांचन ता. हवेली)अजिंक्य रावसाहेब नाळे (२३) वैभव प्रकाश नाळे (२८ दोघे राहणार करावागज ता. बारामती ) अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

६ डिसेंबर २०१९ रोजी ठोसेघर (ता. सातारा ) तसेच इतर ठिकाणी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपद्वारे एका महिलेने ओळख करून एका व्यक्तीस भेटण्याच्या बहाण्याने बोलावले. त्यानंतर त्यास अन्य साथीदारांच्या मदतीने मारहाण, दमदाटी केली. तसेच फोटो, व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देवून लुटमार केली होती.

याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्यानंतर पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केला. या टोळीने बारामती, सातारा व पुणे जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी अनेक लोकांची अशा प्रकारे लुटमार केल्याची माहिती तपासात प्राप्त झाली. समाजामध्ये बदनामी होईल या भितीने संबंधितांनी तक्रारी केल्या नसल्याने ही टोळी निर्ढावली होती.

दरम्यान, या टोळीचा पर्दाफाश करण्याबाबत पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सजन हंकारे यांनी सातारा तालुका पथकातील उपनिरीक्षक अमित पाटील व पथकास मार्गदर्शन केले.

त्यानुसार दहिवडी, पुसेगाव, बारामती, तसेच पुणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी खबर्‍यांमार्फत माहिती मिळवून एका संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अन्य साथीदारांची माहिती प्राप्त झाली. त्या दोन साथीदारांनाही पुणे जिल्ह्यातून पथकाने ताब्यात घेतले. त्यामध्ये एका महिलेचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितांना ताब्यात घेवून त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या टोळीने अशा प्रकारे अनेक ठिकाणी हनीट्रॅपद्वारे लुटमार केल्याचे समोर आले. या संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक
सजन हंकारे करीत आहेत.