सातारा: ज्येष्ठ नागरिक व महिलांवर हल्ले करुन चोरी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील आरोपीच्याकडून एक दरोडा, तेवीस जबरी चोरी, एक घरफोडी व एक चोरी असे एकुण २६ गुन्हे उघड करुन चालू बाजारभावाप्रमाणे एकूण एकोणचाळीस लाख नऊ हजार सहाशे रुपये किंमतीचे अर्धा किलो पेक्षा अधिक (५४ तोळे ३ ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ऑक्टोबर २०२३ मध्ये मालगांव (ता. सातारा) येथे शेतातील घरावर अज्ञात इसमांनी जबरी दरोडा टाकुन वयोवृध्द पती पत्नीस जबर मारहाण केल्या बाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आंचल दलाल यांनी सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना वर्ग केला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील हे करीत होते. लोणंद पोलीस ठाणे हद्दीत जून २०२४ मध्ये अशाच प्रकारचा जबरी चोरीचा गुन्हा नोंद होता. सदरचा गुन्हा व मालगांव येथील दरोडयाचा गुन्हा पोलीस अभिलेखावरील आरोपी शेख सुरेश भोसले( खामगांव ता. फलटण) याने त्याच्या साथीदारांसह केला असून तो फलटण भागात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली.
हेही वाचा : खंबाटकी घाटात रस्त्यावर ऑइल सांडल्याने वाहने घसरली
सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या पथकाने फलटण भागात वेळोवेळी पाळत ठेवून आरोपी शेख सुरेश भोसले व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे कसोशिने तपास करुन त्यांने जिल्हयात सातारा तालुका, सातारा शहर, शाहूपुरी, लोणंद, खंडाळा, फलटण शहर, शिरवळ, औंध, दहिवडी, वडूज, कराड तालुका, फलटण ग्रामीण, भुईंज आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दरोडा, तेवीस जबरी चोरी, एक घरफोडी व एक चोरी असे एकुण २६ गुन्हे केले असल्याचे निष्पन्न करुन चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैंकी ५४ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चालु बाजार भावाप्रमाणे ३९ लाख नऊ हजार सहाशे रुपये किंमतीचे हस्तगत केले. तसेच आरोपीच्याकडून चोरीचे सोने विक्री करीता घेणारा एक इसम निष्पन्न करण्यात आला असून तो फरारी आहे.
नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी असे एकुण ३११ गुन्हे उघड करुन चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी ७ किलो २०५ ग्रॅम वजनाचे ५ कोटी ४ लाख ९६ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.