सुमारे पन्नास दिवसानंतर सुरु झालेल्या मद्य विक्रीच्या दुकानांसमोर सातारा जिल्ह्यात पहाटेपासून तळीरामांच्या अक्षरशा उन्हात रांगा लागल्या होत्या. तर दारू विक्रेत्या दुकानदाराने चक्क मद्यप्रेमींवर फुलं उधळल्याचे दिसून आले. तसेच, आज तळीरामांनी देशी पेक्षा विदेशी ब्रॅण्डला अधिक पसंती दिल्याचेही निदर्शनास आले. प्रत्येक दारू दुकानाबाहेर जवळपास पाचशे मीटरपर्यंत मद्यप्रेमींनी रांग लावली होती.
एवढच नाहीतर काही दुकानांबाहेर ग्राहकांच्या स्वागतासाठी व उन्हापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी काही ठिकाणी मंडप देखील उभारण्यात आले होते. तर अनेक विक्रेत्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे यासाठी दुकानासमोरील रस्त्यावर चौकोन काढले होते. दुकाने दुकानदारांनी तोंडाला मास्क घातले होते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आजपासून मद्य विक्रीची दुकाने सुरु कारण्यास परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील फक्त ४६ मद्य विक्री दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सातारा, कोरेगाव, मेढा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथे दुकाने उघडण्यापूर्वीच पहाटेपासून तळीरामांनी रांगेत गर्दी केली होती.
देशी पेक्षा विदेशी ब्रॅण्ड विकणाऱ्या दुकानांकडे ग्राहकांचा जास्त कल होता. देशी दारुच्या दुकानासमोर दुपारी 12 वाजेनंतर तुरळक गर्दी जाणवली. तर, अन्य दुकानांसमोर रांग कायम होती. मागील दीड महिन्याच्या कालावधीत पतसंस्था, बँका, किराणा व औषध दुकाने यामध्ये सामाजिक अंतर न ठेवता लोक गर्दी करीत आहेत. मात्र आज सामाजिक अंतराचे, मास्क, सॅनिटायझर आदींचे
काटेकोर पालन करत मद्यप्रेमी दारू खरेदी करीत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तर मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या डोक्यावर पुष्पवृष्टी करून अनोखे स्वागत करण्यात येत होते.
जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या दुकाने सुरु करण्यास परवानगी दिल्याचे जाहीर होताच, महिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा फेर विचार करावा अशी मागणी करणारे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पाठवले. राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक शहाजी पाटील यांनी मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना भेट देत नियम पाळले जात आहेत, अथवा नाही याची पाहणी करत व्हिडिओ चित्रीकरण केले.