कराड : आठवड्याभराच्या जोरदार पावसाने आता पडझडीचे सत्र सुरु झाले आहे. घरे, दरडी कोसळण्यासह रस्ते खचणे, बंधारे वाहून जाणे, सखल भागात पाणीच पाणी होणे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर, दुसरीकडे उपयुक्त पावसाने खरीपाचा पेरा उत्कृष्ठ ठरतो आहे. नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होताना, जलसाठे झपाट्याने वाढून अतिशय मजबूत बनले आहेत.

पाटण, कराड व जावली तालुक्यात पावसाचे नुकसान अधिकचे असून, कृष्णा नदीवरील भुयाचीवाडी (ता. कराड) येथील बंधाऱ्याचा काही भाग कोसळून तो वाहून गेला आहे. तर, कामरगाव (ता. पाटण) येथील पाबळ नाल्याजवळ कोयना ते पाटण रस्ता मधोमध खचला आहे. या दोन्ही पडझडीची दाखल संबंधित यंत्रणेने घेतली असून, लोकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मराठवाडी धरणाच्या पाण्याचा फुगवटा मेंढच्या शाळेपर्यंत पोहोचल्याने शिक्षण विभागाने शाळेला सुट्टी दिली आहे. पाटण तालुक्यातील केळोली, कवठेकरवाडी येथे घरांची पडझड होवून नुकसान झाले. मधलीवाडीत घर कोसळून ढिगाऱ्याखाली म्हैस व तिचे पिलू (रेडकू) गाढले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – “बेटा अजित कितना खाया? सरदार ७० हजार कोटी”; विजय वडेट्टीवारांची पंतप्रधान मोदी आणि अजित पवारांवर टीका

पश्चिम महाराष्ट्रात सलग आठव्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिल्याने कृष्णा- कोयनेसह बहुतेक नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यात कृष्णा नदीच्या पाणीपातळीमुळे सांगली तर, पंचगंगेच्या पाणीपातळीमुळे कोल्हापूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. बहुतेक जलसाठ्यांची पाणीपातळी गतीने वाढली असून, तुलनेत जलसाठे सुमारे पन्नास टक्क्यांनी अधिकचे राहिले आहेत.

कोयना धरणाच्या पाणलोटात तुफान पावसामुळे आज बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गेल्या २४ तासात धरणसाठा सलग तिसऱ्या दिवशी पावणेपाच अब्ज घनफुटाने (टीएमसी) वाढून ७१ अब्ज घनफुट (धरण क्षमतेच्या ६७.४५ टक्के) झाला आहे. कोयना पाणलोटात बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गेल्या २४ तासात नवजाला सर्वाधिक २९९ मिलीमीटर, कोयनानगरला २४९, महाबळेश्वरला २६६ मिलीमीटर असा दिवसभरात सरासरी २७१.३३ (१०.६८ इंच) एकूण ३११५.७७ मिलीमीटर (१२२.६६ इंच/ वार्षिक सरासरीच्या ६२.३२ टक्के) पावसाची नोंद आहे.

हेही वाचा – Shyam Manav : “श्याम मानव लवकरच तुतारी गटात जाणार”, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा; म्हणाले, “विधानसभेला…”

प्रमुख जलाशयांपैकी कडवी धरणक्षेत्रात ५० मिलीमीटर, वारणा ४४ कुंभी १६, तारळी ४४, मोरणा १२, धोम- बलकवडी ५५, दुधगंगा ४४, उरमोडी ६९, धोम ४७, ठोसेघर धबधबा ६०, नागेवाडी धरण परिसरात १५ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. अन्यत्र, वाळवण ११६, जोर येथे ९८, वाकी ६५, मोळेश्वरी व रेवाचीवाडीला ६०, मांडुकली ६२, गजापूर ५७, तांदुळवाडी ६४, धनगरवाडा येथे ५४ मिलीमीटर पावसाची नोंद आहे.