विश्वास पवार

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने सातारा हा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सारी शक्ती पणाला लावली आहे. जिल्ह्य़ातील त्यांचे दौरे वाढले आहेत. तसेच ‘यशवंतनीती’ला अनुसरून राजघराण्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे.

स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आलेल्या यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांनी नव्या पिढीतील बहुजन युवकांना राजकारण व समाजकारणात संधी व शक्ती दिली. त्या अनुषंगाने त्यांनी जिल्ह्य़ाच्या राजकारणामध्ये राजघराण्यांचे महत्त्व वाढणार नाही याची काळजी घेतली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात फलटणच्या मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांना हरिभाऊ  निंबाळकर यांनी पराभूत केले यानंतर शंकरराव जगताप, कृष्णचंद्र भोईटे, बाबुराव घोरपडे, भाऊसाहेब गुदगे, प्रतापराव भोसले, विलासराव उंडाळकर आदींना राजकारणात संधी दिली आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना सत्तास्थानी बसवले. जिल्ह्य़ाच्या राजकारणाची घडी बसवत असताना यशवंतरावांनी बहुजनांसाठी राजकीय क्षेत्रात साताऱ्याच्या राजघराण्याशी विशेषत: सुमित्राराजे भोसले यांच्याशी सौहार्दाचे संबंध ठेवले, मात्र त्यांना सत्तेपासून दूरच ठेवले. पुढे जनता पक्षाच्या माध्यमातून १९७७ साली अभयसिंहराजे भोसले यांचा राजकारणात उदय झाला तर त्याच वेळी उदयनराजेंचे वडील प्रतापसिंहराजे हे साताराचे थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. १९९२ मध्ये सातारा पालिका निवडणुकीत दोन प्रभागांमधून लढलेल्या उदयनराजे यांचा एका प्रभागात पराभव झाला होता. विशेष म्हणजे हा पराभव भाजपच्या एका  कार्यकर्त्यांने केला होता. १९९७ मध्ये त्यांनी लोकसभेला अपक्ष म्हणून नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला ते पराभूत झाले. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत अभयसिंहराजे खासदार झाले त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांचा पराभव केला. पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या जवळिकीमुळे उदयनराजे महसूल राज्यमंत्री झाले. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत अभयसिंहराजे भोसले यांच्याकडून उदयनराजेना पराभूत व्हावे लागले. अभयसिंहराजेंचे निधन झाले त्यानंतरच्या निवडणुकीत पुन्हा शिवेंद्रराजेंकडून उदयनराजे पराभूत झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर प्रतापराव भोसले यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी शरद पवार यांनी सातारा, फलटण, पाटण या राजघराण्यांना राजकारणात संधी दिली. सातारच्या राजघराण्यातील  प्रभावानंतरही दोन्ही राजांना सातारा शहराचा तुलनेने विकास औद्योगिक प्रगती साधता आली नाही.  सातारा शहरामध्ये चाळीस वर्षांच्या राजघराण्याच्या राजकारणामध्ये औद्योगिक व शहरी विकास साधताना पायाभूत सुविधा, मोठे सरकारी प्रकल्प आणता आले नाहीत.  त्यामुळे आता शरद पवार यांनी राजांना शह देण्याची रणनीती आखली आहे.

Story img Loader