वाई : किसन वीर सहकारी साखर कारखान्यासाठी घेतलेल्या कर्जप्रकरणात माझ्याकडून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून कारखान्याचे व्यवस्थापन माझ्याकडे नाही. माझ्या कार्यकाळात संबंधित बँकेने मला या कर्जप्रकरणाबाबत का विचारणा केली नाही? असा सवाल किसन वीर कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी आमदार मदन भोसले यांनी उपस्थित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जप्रकरणात तब्बल ६१ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने दिल्लीतील सीबीआय कार्यलयात दिली आहे. यानंतर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष व भाजपचे नेते माजी आमदार मदन भोसले, तत्कालीन उपाध्यक्ष चंद्रकांत बजरंग इंगवले, तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक भार्गव जाधव व इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा…दिल्लीतल्या बैठकीत निर्णय, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार!

या पार्श्वभूमीवर मदन भोसले म्हणाले, किसन वीर कारखान्याच्या प्रगतीसाठी आमच्या व्यवस्थापनाने बँकांकडून कर्ज घेतले होते. तसेच बँक ऑफ इंडियाकडून घेतलेले कर्ज हे ज्या कारणासाठी घेतले होते, ते त्याच कारणासाठी वापरले आहे. यातील काही रक्कम थकित असेल. मात्र, या कर्जप्रकरणात माझ्या व्यवस्थापनाने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. माझ्याकडे गेल्या दोन वर्षांपासून कारखान्याचे व्यवस्थापन नाही. माझ्या कार्यकाळात २०१० पासून कारखान्याने या बँकेशी नियमितपणे व्यवहार केला आहे. मात्र, आमच्या व्यवस्थापन काळात बँकेने गैरव्यवहाराबाबत चकार शब्द काढला नव्हता. मग व्यवस्थापन बदलल्यानंतर आता बँक प्रशासनाला गैरव्यवहाराबाबत कुठून साक्षात्कार झाला? असा सवालही भोसले यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara s kisanveer sahakari sakhar karkhana s former president madan bhosale denies loan fraud allegations psg