कराड : सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांवरील मोटार वाहन कर, पर्यावरण कर थकवल्याप्रकरणी तब्बल १० हजार १५० वाहनधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये खासगी व परिवहन संवर्गातील वाहनांचा समावेश असून, नोटीस पाठवलेल्या वाहनधारकांनी निर्धारित वेळेत कर न भरल्यास त्यांचे वाहन जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केलेल्या व्यावसायिक वाहनांकडून वार्षिक कर आकारला जातो. तसेच नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांकडून नोंदणीच्या वेळीच एकरकमी कर घेतला जातो. यामध्ये मोटार वाहन कर व पर्यावरण कराचा समावेश आहे. व्यावसायिक वाहनांनी ठरावीक कालावधीनंतर कर भरणे अपेक्षित असते. सातारा जिल्ह्यात १० हजार १५० वाहने कर न भरता रस्त्यावर धावत आहेत. या थकीत कराची रक्कम २ कोटी ९६ लाख ५२ हजार रुपयांची आहे.

वाहन कर, पर्यावरण कर आदी कर थकीत असलेल्या वाहनांची तपासणी करण्यासाठी परिवहन (आरटीओ) कार्यालयात वायुवेग पथके कार्यरत आहेत. या पथकांमार्फत कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहनधारकांचा कर थकीत आहे त्यांना प्रथम नोटीस पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांची थेट ‘घरी भेट’ घेऊन वाहन जप्त करण्यात येणार असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील कर न भरणाऱ्या वाहनधारकांना नोटीस पाठवल्या असल्याने कर थकवलेल्या वाहनधारकांकडून हा कर वसूल करण्यासाठी कार्यवाहीचे काम प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हाती घेण्यात आले आहे. थकीत कर न भरणाऱ्या वाहनांवर कारवाई अपरिहार्य असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी म्हटले आहे.