वाई: पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन क्षेत्रातील मुनावळे (ता.जावली) गावच्या हद्दीत अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील तीन महिने हजारो वृक्षांची अवैध वृक्षतोड सुरु आहे. साताऱ्यातील धनिकाने ही वृक्षतोड केली आहे. मात्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी व वनविभागासह इतर शासकीय यंत्रणांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

पुणे-मुंबईसह साताऱ्यातील काही बड्या धनिकांनी मुनावळे परिसरात जमिनी खरेदी केल्या आहेत. या जमिनींवर भूखंडमाफियांच्या सामूहिक टोळ्या सध्या कार्यरत असून त्यांनी आगामी जल पर्यटनाच्या विकास योजनांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून ठेवल्याचे बोलले जात आहे. पुणे-मुंबईच्या या धनदांडग्यांनी शिवसागर जलाशयाच्या परिसरात आलिशान बंगले बांधण्याचे मनसुबे रचले आहेत. त्याचीच पूर्तता म्हणून मुनावळे गावच्या हद्दीत सर्व्हे नं. २९/२ क्षेत्रातील १९ एकर पैकी सहा एकर क्षेत्रामध्ये साताऱ्यातील एका धनिकाकडून अवैध जंगली झाडांची वृक्षतोड करून छोट्या-मोठ्या हजारो वृक्षांची कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान भारतीय वन अधिनियम व वन्यजीव संरक्षण अधिनियम महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र झाडे तोडणे अधिनियम, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सारख्या अनेक महत्त्वाच्या कायद्यांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले आहे. यावेळी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे. हे सर्व काम वनखात्याच्या कर्मचाऱ्यांच्या परस्पर मूक संमतीने सुरु असल्याचे उघड झाले आहे. परिणामी ज्या कार्यक्षेत्रात ही वृक्षतोड सुरू आहे त्या ठिकाणी काम करणारे वनपाल व वनरक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या प्रकाराची कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुनावळे परिसरात नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला मिळालेले संरक्षण हे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. अतिरिक्त मानवी हस्तक्षेप, नियमबाह्य सुरू असलेली बांधकामे, खाणकामे, अवैध वृक्षतोडी, मोठ्या प्रमाणावर होणारे पर्यावरणीय ऱ्हास हे जागतिक वारसा स्थळाचे संरक्षण काढण्यासाठी पुरेसे आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला, “कंबरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले ‘शर्त’ आणि ‘शर्ट’ असले…”

मुनावळे येथील हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या भागात समृद्ध जैवविविधता आहे. बाहेरील लोकांना जमीन खरेदीवर मनाई असणे आवश्यक आहे. टुरिझमच्या नावाखाली हा प्रकार सुरु आहे. या अवैध वृक्षतोडीचा फटका वन्यजीवांना देखील बसत आहे. तरी ही वृक्षतोड तात्काळ थांबवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. – ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ, डॉ. मधुकर बाचुळकर

हेही वाचा – छगन भुजबळांचे परतीचे संकेत आहेत का? शरद पवार म्हणाले, “माझी आणि त्यांची…”

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत मुनावळे तालुका जावली येथील खाजगी जागेमध्ये वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. – उत्तम सावंत, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.