कराड : अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून जटा निर्मुलन करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. पशुवैद्यकीय दवाखाना चाफळ अंतर्गत शिंगणवाडी (ता. पाटण) येथे हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून समाजातील गैरसमजुती, फसवणूक अशा प्रकारांचा पर्दाफाश करण्याबरोबरच त्यासंदर्भात प्रबोधनही केले जाते. या कार्यात सेवाभावी वृत्तीने अनेक जण सहभागी असून, त्यांना या कामी प्रशिक्षणही मिळते. असेच ‘अंनिस’च्या कार्यात सहभाग दर्शवणारे डॉ. अनिल घाडगे हे एक असून, ते अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात हिरिरीने काम पाहतात. त्यांच्या नजरेत डोक्यावर जटांचे ओझे २० वर्षांपासून वागवणाऱ्या
आजी सोनाबाई पवार आल्या. आणि त्यांनी जटामुक्तीचे कार्य साध्य केले.

चाफळ पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. अनिल घाडगे हे गाईच्या उपचारासाठी शेतकरी अक्षय पवारांकडे गेले होते. तेव्हा अक्षयची आजी सोनाबाई पवारांना जटा असल्याचे निदर्शनास येताच डॉ. घाडगे यांनी पवार कुटुंबीयांना जटांबाबत दैविक गैरसमजूत आणि शास्त्रीय दृष्टिकोन पटवून दिला. त्यानंतर पवार कुटुंबीयांनी जटा निर्मुलनासाठी सर्वानुमते तयारी दर्शवली. यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या (अंनिस) जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने व सातारा शहराध्यक्ष डॉ. दीपक माने यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनीही समितीचे कार्य आणि जटा निर्मुलनाची सविस्तर माहिती दिली आणि शिवजयंतीला जटा निर्मुलनाचा उपक्रम यशस्वी झाला.

जटा असलेल्या श्रीमती सोनाबाई पवार यांनी आयुष्यातील धाडसाचे व हजरजवाबी स्वभावाचे किस्से सांगितले. पवार परिवारातील अक्षय आणि त्यांचे वडील विजय आनंदराव पवार हेही सामाजिक उपक्रमात पुढे असतात. संगीता व पुष्पा पवार यांनीही उपक्रमासाठी सहकार्यासह परिसरात आणखी जटा निर्मुलनासाठी मदत करण्याची ग्वाही दिली. लगेचच आजी सोनाबाईंच्या जटा सोडवण्यात आल्या. यावर त्या म्हणाल्या, डोक्यावर २० वर्षांहून अधिक काळ जटा असताना पडणारा ताण आणि मानेच्या त्रासातून आता सुटका झाल्यामुळे मनावरचं ओझंही हलकं झालं. घाडगे डॉक्टरांनी समजून सांगितल्यावर मनावरचं आणि मानेवरचंही दडपण संपल्याचे सोनाबाई पवार यांनी सांगितले. सौ. वंदना व डॉ. दीपक माने म्हणाले, सातारा जिल्ह्यातील आजवर १५८ ठिकाणी जटा निर्मुलन करण्यात आले. हे कार्य करताना, आम्हाला आनंद अन् उत्साह मिळतो.