वाई: साताऱ्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हुतात्मा पोलीस अधिकाऱ्याच्या नातीवाईकांसोबत आपली दिवाळी साजरी केली साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून दिवाळीतच समीर शेख यांनी पदभार स्वीकारला. ते गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक होते. शेख यांनी यापूर्वी साताऱ्यात काम केलेले असल्याने व त्यांच्या कामाची ओळख असल्याने सातारकरांनी त्यांच्या नियुक्तीचे उत्साहात स्वागत केले आहे. त्यांनी गडचिरोली येथील लाहेरी पोलीस ठाण्यात ८ ऑक्टोबर२००९ रोजी नक्षलवाद्यांशी लढताना केलेल्या बॉम्बस्फोटात हुतात्मा झालेले धोम ( ता वाई) येथील चंद्रशेखर देशमुख या पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांसोबत आपली दिवाळी साजरी केली. चंद्रशेखर देशमुख यांचे आई-वडील धोम येथे राहतात आपली शेती करतात .
हेही वाचा >>> बोथी येथे डुकराच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू तर शेवाळा शिवारात कोल्ह्याने सात जणांना चावा घेतला
समीर शेख हे गडचिरोली येथे अधिकारी होते आणि ते आता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक झाले आहे.गडचिरोली येथून सातारा आणि आता धोमला सपत्नीक घरी आल्याने हुतात्मा चंद्रशेखर देशमुख यांचे वडील संजय आणि आई सोयरा यांना खूप आनंद झाला. त्यांनी दुखावेग बाजूला ठेवून त्यांनी शेख यांचे स्वागत केले. समीर शेख यांनी सपत्नीक देशमुख यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. किमान दीड तास त्यांच्यासोबत गप्पांमध्ये व्यतीत केला.दिवाळी भेट दिली. कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करा असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर शेख यांनी वाईच्या गणपती मंदिरात महागणपतीचे दर्शन आणि आरतीही केली.वाई पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांची आस्थेवाईक पणे चौकशी केली, अडचणी जाणून घेतल्या. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, उपनिरीक्षक कृष्णकांत पवार, स्नेहल सोमदे,,सुधीर वाळुंज आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यानंतर समीर शेख यांनी भुईंज पोलीस ठाण्याला भेट दिली.सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पोलीस ठाण्याबाबत माहिती दिली.