सातारा : साताऱ्यात नव्याने आधुनिक पद्धतीचे अद्ययावत विमानतळसदृश बस स्थानक तयार केले जाणार आहे. त्यामुळे हे मध्यवर्ती महत्त्वाचे बस स्थानक ठरणार आहे. यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. सातारा हे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेले महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे येथून दररोज हजारो प्रवाशांसाठी शेकडो एसटी बसची आवक-जावक होत असते. सातारा हे मध्यवर्ती बस स्थानक असल्याने पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर अशी प्रमुख शहरे, तसेच शेजारील राज्यांमध्येही बससेवा उपलब्ध असल्याने हजारो प्रवाशांसाठी बस स्थानक एक महत्त्वाचा वाहतुकीचा केंद्रबिंदू ठरतो.

सातारा बस स्थानक विकास प्रकल्पासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासन खर्च करणार आहे. एमएसआरडीसीकडून लवकरच या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या विकासामुळे स्थानिक व्यापारी, फेरीवाले, वाहतूकदार, टॅक्सीचालक, फूड स्टॉलचालक यांना अधिक संधी उपलब्ध होणार आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या बसस्थानकात व्यावसायिकांना १३ दुकाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पर्यटन, व्यवसाय व शिक्षणासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार असून, त्याचा थेट लाभ साताऱ्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून साताऱ्यात अद्ययावत बसस्था नक व्हावे अशी नागरिकांची मागणी होती. त्याप्रमाणे आता येथे नव्याने अद्ययावत बस स्थानक उभारण्यात येणार आहे.

सातारा शहराला ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनाला मोठा वाव असल्याने अभ्यासकांशी चर्चा करून नव्या बस स्थानकाला वेगळे रूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मात्र, केवळ शोभनीयतेकडे न पाहता प्रवाशांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत याचाही प्रकल्पामध्ये अंतर्भाव केला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी हे बस स्थानक निश्चितपणे सोयीचे आणि आकर्षक ठरेल, याची मला खात्री आहे.

शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री

Story img Loader