कराड : पश्चिम घाटक्षेत्रात आठवड्याभरापासून सुरु असलेल्या सलग पावसाने जलचित्रच पालटले आहे. आजवरच्या सरासरीपेक्षा हा पाऊस जवळपास १५ टक्क्यांनी ज्यादाचा राहताना, चिंताजनक जलसाठे तुलनेत समाधानकारक स्थितीत आहेत. खरीपाचा अतिशय उत्तम असा पेरा पूर्णत्वाला जात असल्याने समाजमनाला चैतन्याचा बहर आला आहे.

पुराची धास्ती

पश्चिम महाराष्ट्रात सलग सातव्या दिवशी पावसाचा जोर टिकून आहे. तर, वेधशाळेने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवल्याने हा पाऊस कायम राहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पावसाने जनजीवन विस्कळले असून, रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. लोकांना नद्यांना पूर येण्याची धास्तीही लागून राहिली आहे.

हेही वाचा – सांगली: धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने महापूराची धास्ती

कोयना पावणेपाच अब्ज घनफुटाने वधारले

१०५.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणाच्या पाणलोटात मुसळधार सुरुच असून, आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गेल्या २४ तासात धरणसाठा पुन्हा पावणेपाच अब्ज घनफुटाने वधारला आहे. कोयनेचा हा जलसाठा दोनतृतीय्यांश भरण्याकडे वाटचाल करीत असताना, सकाळी १० वाजलेपासून धरण व्यवस्थापनाने पायथा वीजगृह निम्म्या क्षमतेने कार्यान्वित करून कोयना नदीपात्रात अल्पसा १,०५० घनफुटाचा (क्युसेक) जलविसर्ग सुरु केला आहे. सर्वच जलस्रोत वाहते झाले असून, जलसाठे भक्कम बनले आहेत.

कोयना पाणलोटात ८.७२ इंच पाऊस

कोयना पाणलोटात मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कोयनानगरला सर्वाधिक २४४ मिलीमीटर एकूण २,८१३, महाबळेश्वरला २१८ एकूण २,७२२ नवजाला २०२ एकूण ३,२८५ मिलीमीटर असा दिवसभरात सरासरी २२१.३३ (८.७२ इंच) एकूण २९४० मिलीमीटर (११५.७५ इंच/ वार्षिक सरासरीच्या ५८.८० टक्के) पावसाची नोंद आहे.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा मोठे निर्णय; आशा स्वयंसेविकांना १० लाखांचा अपघाती विमा मिळणार

प्रमुख जलाशयांवरही जोरधार

मंगळवारी दिवसभर प्रमुख जलाशयांवरही जोरधार सुरु आहे. त्यात कडवी धरणक्षेत्रात ५२ मिलीमीटर, वारणा ३६, कुंभी २३, तारळी ३५, मोरणा २५, धोम- बलकवडी २७, दुधगंगा व उरमोडी १२, धोम १७, ठोसेघर धबधबा ६१, नागेवाडी धरण परिसरात ६ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. अन्यत्र, जोर येथे ९५, रेवाचीवाडीला ७४, मांडुकली ६२, गजापूर ५१, वाळवणला ४५, गगनबावडा येथे ४६ मिलीमीटर पावसाची नोंद आहे.

कोयनेचे पायथा वीजगृह क्षमतेने सुरु होणार

धरण परिचालन सूचीप्रमाणे जलसाठा नियंत्रण धोरणानुसार कोयना शिवसागराचा जलसाठा ६२ टक्क्यांच्या जवळपास असताना धरण्याच्या पायथा विजगृहातील दोनपैकी एक यंत्रणा सुरु करून, कोयना नदीपात्रात मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून प्रतिसेकंद १,०५० घनफूट (२९,७३६ लिटर) पाणी सोडण्यात येत आहे. किती तारखेला किती पाणी साठवण असावी हे निश्चित करण्यात आल्याने हा सर्वसाधारण विसर्ग सुरु आहे. लवकरच पायथा विजगृह क्षमतेने कार्यान्वित करणार असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.