वाई: छत्रपती शाहु महाराजांचा राज्यभिषेक सातारा स्वाभिमान दिन किल्ले अजिंक्यताऱ्यावरील राजसदरेवर अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहु महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडाच्या प्रवेशद्वारापासून छत्रपती शाहु महाराजांच्या पालखीला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. पालखी भराभर मावळ्यांनी गडाच्या पायऱ्या चढवत गडावर नेली. गडावरील देवतांचे दर्शन घेवून राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहु महाराज की जय अशा घोषणा देत विसावली. यावेळी कन्हैय्यालाल राजपुरोहित, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक शेखर मोरे पाटील, दत्ताजी भोसले, अमरदादा जाधव शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-शिवराजसिंह चौहान पुण्यात गरजले; म्हणाले, “मी नाकारलेला नाही, आजही…”

१२ जानेवारी १७०८ रोजी छ. शाहु महाराजांनी आपला राज्यभिषेक करुन घेतला आणि या अजिंक्यताऱ्याला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केले. १७०८ पासून ते १८१८ पर्यंत ११० वर्षाचा कालखंड हे सातारा शहर आणि किल्ले अजिंक्यतारा हे मराठा साम्राज्याची राजधानी विराजीत होती. १७०८ पासून १७४९ पर्यंत स्वतः थोरले छ. शाहु महाराज यांचे राज्य चालत होते. १७२१ मध्ये छ. शाहु महाराजांनी सातारा शहराची स्थापना केली आणि किल्ले अजिंक्यताऱ्यावरचा कारभार सातारा शहरात सुरु केला. आजही सातारा शहरात अनेक इतिहासाच्या पाऊलखुणा पहायला मिळतात.

या निमित्त किल्ले अजिंक्यताऱ्याच्या प्रवेशद्वार झेंडूच्या फुलांनी , रांगोळ्या सजविण्यात आले होते. तुताऱ्यांचा निनाद प्रवेशद्वारावर घुमत होता. सनईचा मंजूळ स्वर वाजत होता. या सोहळ्यात पालखीचा मान मुस्लिम बांधवांना देण्यात आला. अगदी मंदिरापर्यंत त्यांना हा सन्मान देण्यात आला .किल्यावर मंगळाईच्या दर्शनानंतर आज राजमाता जिजाऊ जयंती असल्याने उपस्थित महिला भगिनींनी छत्रपती शाहु महाराजांच्या पालखीला खांदा दिला. पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.वेद अॅकॅडमीच्यावतीने साहसी खेळ राजसदरेवर करण्यात आले.

आणखी वाचा-सातारा : श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे निधन

शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जुन पुरस्कार विजेता ओजस देवतळे यांच्या सह अनेकांचा सन्मान करण्यात आला. सातारा स्वाभिमान दिनाच्या निमित्ताने अजिंक्यतारावर सातारकरांनी मोठी गर्दी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara swabhiman day is celebrated with enthusiasm at ajinkyataraya fort mrj