साताऱ्यात काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) आजारामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात या आजाराच्या एकूण २८ रुग्णांवर सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
म्युकरमायकोसिस या आजारांमध्ये ३० ते ६० वयोगटाच्या २८ रुग्णांवर साताऱ्यात उपचार सुरू आहेत. यातील ९ रूग्ण जिल्हा रुग्णालयात तर २१ खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र लहान मुलांमध्ये या प्रकारच्या लक्षणांचे रुग्ण आढळून आलेले नाहीत, असेही डॉ.चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव खूपच वाढला आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने कोविड आजारानंतर नव्याने आलेल्या म्युकरमायकोसिस आजाराचा धोकाही वाढला आहे. करोना नंतर होणारा व नव्याने पुढे आलेल्या या आजाराचे ३१ रुग्ण आढळून आले आहेत. यामधील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात दोन व एका रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अशी डॉ.सुभाष चव्हाण म्हणाले की, “या आजाराची लक्षणे असलेला रुग्ण जिल्हा रुग्णालयातच दाखल होतो असे नाही, त्यामुळे या जिल्ह्यातील डॉक्टरांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. जिल्ह्यातील खासगी व सरकारी रूग्णालयांमध्ये या प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यास याबाबत जिल्हा रुग्णालय व जिल्हा अधिकारी कार्यालयाला माहिती देणे केंद्र शासनाच्या नियमान्वये बंधनकारक आहे व तसे आदेश सर्व रुग्णालयांना बजावण्यात आले आहेत. या आजाराच्या उपचारासाठी जिल्हा स्तरावर कान, नाक, घसा तज्ज्ञ, डोळ्यांचे तज्ज्ञ, प्रयोगशाळा तज्ज्ञ आदींची एक बैठक घेतली आहे. या आजारावरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिस नावाचा कक्ष तयार करण्यात आला आहे. याबाबतच्या उपचारासाठी आम्ही खासगी डॉक्टरांचीही मदत घेणार आहोत. यामध्ये आम्ही संशयित रुग्णांवर सर्वांच्या मदतीने उपचार करणार आहोत. रुग्णास हा आजार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर मेडिकल व सर्जिकल पद्धतीने उपचार करणार आहोत. या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक ती औषधं जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. त्याचा पुरवठा उपसंचालक कार्यालयातून नियमित होत आहे. या सर्व रुग्णांना करोना होऊन गेलेला आहे. त्यांच्यामध्ये उच्च व नियंत्रणात नसलेल्या (अंकन्ट्रोल्ड)मधुमेहाची लक्षणे आहेत. कोविड उपचारांमध्ये स्टेरॉइड औषध प्रकारचा जास्त वापर होत असल्याने हे नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. या आजाराबाबत आम्ही सकाळी व संध्याकाळी आठ वाजता जिल्ह्यातील सर्व रूग्णालयांचा आढावा घेत आहोत. तर, मृत्यू झालेले रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील आहेत.”