सातारा : सातारा सज्जनगड रस्त्यावर अंबवडे खुर्द (ता. सातारा) गावच्या हद्दीत रविवारी मालवाहू जीप दुचाकीला धडकून झालेल्या भीषण अपघातात पंधरा वर्षीय दोन मित्रांचा मृत्यू झाला. वेदांत शरद शिंदे व प्रज्वल नितीन किर्दत (दोघे रा. अंबवडे खुर्द ता. सातारा) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. राहुल भरत देवरे (सायळी पो. दहिवड, ता. सातारा) हा युवक जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सातारा तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेदांत शिंदे आणि प्रज्वल किर्दत हे दररोज सकाळी डबेवाडी येथे क्लाससाठी जातात. आज तिथून गावी येताना त्यांनी एका दुचाकी स्वाराकडे घरी घेऊन जाण्याची विनंती केली. यावेळी जात असताना मालवाहू जीपचालक पांडुरंग विठ्ठल गावडे ( बेंडवाडी पो. आसनगाव ता. सातारा) साताऱ्यातून परळी गावाकडे निघाला होता. अंबवडे खुर्द येथे या दोन्ही गाड्यांचा भीषण अपघात झाला. यावेळी दोन्ही मुले दुचाकीवरून रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली. या जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. जखमींना ताबडतोब सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी गाडीचा चालक पांडुरंग विठ्ठल गावडे (बेंडवाडी, ता. सातारा) याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सातारा तालुका पोलीस करत आहेत. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गुरव आणि हवालदार विशाल मोरे अधिक तपास करत आहेत.