वाई: निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे सध्या कुतूहलाचे विषय ठरत असताना साताऱ्यातून भाजपचे उमेदवार असलेले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट झाल्याचे समोर आले आहे. उदयनराजे यांनी आज अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये १७२ कोटी ९४ लाखांची मालमत्ता दाखवली आहे. मागील निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची मालमत्ता १९३ कोटी रुपयांची असल्याचे नोंदवण्यात आले होते.
उदयनराजे यांनी गुरुवारी सातारा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्तीही समोर आली आहे. उदयनराजेंकडे १७२ कोटी ९४ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये प्रमुख मालमत्ता ही वारसाप्राप्त असून ती एक अब्ज ३४ कोटी ९३ लाख रुपये एवढी आहे. यापूर्वीच्या निवडणुकीतही त्यांची वारसाप्राप्त मालमत्ता ही एवढीच दाखवण्यात आलेली होती. आज दाखल केलेल्या या विवरणपत्रात उदयनराजेंकडे एक कोटी ९० लाख रुपयांच्या नऊ आलिशान मोटारी आहेत. उदयनराजेंकडे दोन कोटी सात लाख ७४ हजारांचे दागिने तर दमयंतीराजेंकडे ८५ लाख २८ हजार रुपयांचे दागिने आहेत.
हेही वाचा – यंदा चारा छावण्यांना परवानगी नाही; भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय?
उदयनराजे यांच्याकडे पाच लाख ८५ हजार ७१७ रुपये रोख रक्कम तर दमयंती राजे यांच्याकडे पाच लाख २७ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. उदयनराजे यांच्याकडे पाच कोटी ८५ लाख तर दमयंतीराजे यांच्या पाच कोटी सत्तावीस लाखांच्या ठेवी आहेत. दरम्यान उदयनराजे यांच्यावर आठ कोटी ४५ लाख ५७ हजार रुपयांचे कर्ज असल्याचेही या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. उदयनराजे यांच्याविरुद्ध आंदोलनाचे सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये अद्याप दोषारोपपत्र सादर झालेले नाही.