वाई: सातारा शहरालगत असलेल्या प्रतापसिंह नगरातील गुंड दत्ता जाधव लल्लन जाधवसह २२ सराईत गुन्हेगारांच्या घरावर बुधवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने बुलडोझर फिरविला. येथील अनधिकृत बांधकामे साताऱ्याच्या महसूल व पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. प्रतापसिंह नगरातील गुन्हेगारी कायमची मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
साताऱ्याचे उपनगर खेड ग्रामपंचायत हद्दीतील प्रतापसिंहनगर वस्तीत गट नंबर ७० मशील २५९ गुंठे मुलकी पड क्षेत्रात काही गरीब कुटुंबीयांना पूर्वी १० बाय १० एवढीच जागा रहिवास कारणास्तव दिली होती. या शासकीय जमिनीवर काही अटीशर्तीवर दिलेल्या या जागेत प्रत्येकाने सोईस्कर विनापरवाना अनेकांनी रहिवास आणि वाणिज्य कारणास्तव मोठ्या प्रमाणावर कच्ची, पक्की बांधकामे केली आहेत. येथे सातत्याने गुन्हेगारी कारवाया करत मारहाण, लुटालूट, गंभीर गुन्हे करणार्यांच्या कुटुंबांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करत शासकीय जमीन बळकावली होती. तसा अहवाल गटविकास अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी यांच्या स्थळ पाहणी अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला होता. यानंतर या कुटुंबांना दि २६ मार्च अखेर अतिक्रमण काढून घेण्याच्या महसूल विभागाने नोटीसा बजावल्या होत्या . यावरूनच मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा – कंगनाविरोधात हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांबरोबरच ‘राजघराणी’ एकत्र?
सातारा शहरालगत असलेले प्रतापसिंहनगर गुन्हेगारी आणि गुंडगिरीसाठी ओळखले जाते. या प्रतापसिंहनगरातून सातत्याने गुन्हेगारी कारवाया होत असतात. याच नगरात राहणारा गुंड दत्ता जाधव याची मोठी दहशत होती. खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे गुंड दत्ता जाधव याच्यावर दाखल आहेत. सध्या तो मोक्का कारवाईअंतर्गत कारागृहात आहे. गेल्या आठवड्यात गुंड दत्ता जाधव याचा मुलगा अजय उर्फ लल्लन जाधव तडीपार असताना त्याने परिसरातील अनेक गाड्यांची मोडतोड करत एका तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर तलवारीने वार करून जखमी केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा प्रतापसिंहनगर चर्चेत आले. गुन्हेगारीच्या वरदहस्तामुळे तेथील गुंडांनी जागा बळकावून टोलेजंग इमारती बांधल्या होत्या. प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारी होत्या. मात्र, आत्तापर्यंत ठोस कारवाई केली जात नव्हती.
हेही वाचा – राणा दाम्पत्याची चहूबाजूंनी कोंडी, महायुतीतून आव्हान, भाजपमधूनही विरोध
प्रतापसिंह नगरातील वाढती गुन्हेगारी सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे पुढे आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुंडांची अनाधिकृत बांधकामे केलेली घरे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एकूण १६ घरांवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई करण्यात येत आहे.
तब्बल २२ गुन्हेगारांची यादी तयार करून प्रशासन बुधवारी सकाळी प्रतापसिंह नगरात बुलडोझर घेऊन पोहोचले. संबंधित २२ गुन्हेगारांची घरे शोधून त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यास सुरूवात केली. ही कारवाई दिवसभर सुरू राहणार आहे. २२ गुन्हेगारांची घरे भुईसपाट केली जाणार आहेत. या कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.