सातारा :वळसे (ता. सातारा) येथील पुरातन महादेव मंदिर असलेल्या डोंगरावर अज्ञाताने वणवा लावला. वळसे येथील ग्रामस्थ व युवकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यानंतर वन विभागाचे कर्मचारी व गावातील १० ते १२ युवकांनी वणवा आटोक्यात आणून वनसंपदेचे नुकसान टाळले. वळसे येथील लगतच्या डोंगरावर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. या डोंगरावर जानाई मळाई डोंगराच्या बाजूने अज्ञात व्यक्तीने सायंकाळी ५ च्या सुमारास आग लावली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.
डोंगरावर वणवा लागल्याचे गावातील ग्रामस्थ महेंद्र कदम, नितीन कदम आणि चंद्रकांत उर्फ बाळा कदम, विपुल कदम, ऋतुराज गोडसे, प्रथमेश कदम, तेजस कदम, पार्थ कदम, गणेश कदम, विघ्नेश सुतार, राज कदम, मयूर निंबाळकर, सुरज जाधव, स्वप्नील चव्हाण आदी युवकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वनरक्षक अभिजित कुंभार यांच्याशी सपंर्क करून त्यांना पाचारण केले. कुंभार व त्यांचे कर्मचारी वणवा आटोक्यात आणण्यासाठीचे आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि युवकांनी डोंगरावर धाव घेऊन अथक परिश्रम घेत वणवा आटोक्यात आणला. यामुळे वनसंपदेचे मोठे नुकसान टळले. वळसे गावातील ग्रामस्थ आणि युवक नेहमीच दक्ष राहून डोंगरावर वणवा लागू नये याची काळजी घेत असतात. यावेळीही त्यांनी तत्परता दाखवून वणवा आटोक्यात आणण्यासाठी मोलाची मदत केली, याबद्दल वन विभागाच्यावतीने कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच कोणीही वणवा लावू नये, सर्वांनी वनसंपदेचे रक्षण करावे असे आवाहन त्यांनी केले.