सातारा : सातारा जिल्हा आणि जिल्हा परिषद ही नेहमीच शासनाच्या विविध योजना, उपक्रमांत आघाडीवर असते. अशाच प्रकारे आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची १०० टक्के डिजिटल हजेरी सुरू झाली आहे. यामुळे सातारा जिल्हा परिषदेने राज्यात ऑनलाइन प्रणालीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग विविध योजनांमध्ये नेहमीच अग्रेसर असतो, तसेच शासनाच्याही बहुतांश नवीन योजना, मोहिमेची सुरुवात ही सातारा जिल्ह्यातूनच होत असते. प्रत्येक बाबतीत पुढे असणाऱ्या या जिल्ह्यात आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एका बाबतीत साताऱ्याने अत्यंत समाधानकारक अशी कामगिरी केलेली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग आयुक्तांच्या ५ मार्च २०२५ च्या आदेशानुसार आरोग्य विभागांतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी फेस रीडिंग, तसेच बायोमेट्रिक पद्धतीने करण्याची प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करायची होती. त्याचबरोबर एप्रिलपासूनचे मासिक वेतन ऑनलाइन दैनंदिन हजेरी अहवालानुसारच अदा करण्याबाबत सूचना होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी नोंद करण्यासाठी ॲप्लिकेशनचा वापर सुरू केला, तसेच याअंतर्गत १ हजार ५१२ नियमित कर्मचारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १ हजार १२० कर्मचाऱ्यांची नोंद प्रणालीत करण्यात आलेली आहे.

यूबीआय ॲपमध्ये ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ‘यूबीआय’ ॲपमध्ये जिल्हास्तरावरील जिल्हा परिषद, प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय, पंचायत समिती स्तरावरील ११ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये, ३ उपजिल्हा रुग्णालये, १५ ग्रामीण रुग्णालये, ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४१५ उपकेंद्रे आदी आरोग्य संस्थांचा समावेश आहे.

सातारा जिल्हा नेहमीच विविध योजना, उपक्रमांमध्ये राज्यात अग्रेसर असतो. बहुतांश नवीन पथदर्शी प्रकल्पांची सातारा जिल्ह्यातूनच सुरुवात होत असते. आता सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ऑनलाइन हजेरी प्रणालीचा यशस्वी अंमलबजावणी करणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. ही मोठी कामगिरी ठरलेली आहे.

याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी