सरकार पडणार म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, या ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विधानाला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. चंद्रकांत खैरे यांनी खासदार म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. त्यांनी एका पक्षाबाबत असे विधान करण्याची गरज नव्हती. एका बाजूला उद्धव ठाकरे, शरद पवार तसेच कॉंग्रेसचे नेते हे महाविकास आघाडी म्हणून पुढे जात आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले आहे. शरद पवार यामध्ये सहभागी होणार आहेत. अशावेळी कारण नसताना समाजात गैरसमज होतो. तो टाळला पाहिजे. यासाठी खैरे यांनी विधान मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी गृह राज्यमंत्री, कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी येथे केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- मोठी अपडेट! सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी तब्बल दाेन महिन्यानंतर गुन्हा दाखल

यात्रेत कोल्हापुरी फेटे

येथे पत्रकारांशी बोलत असताना सतेज पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कोल्हापूरचे वेगळेपण राहणार असल्याचे नमूद केले. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सहा आमदार, बारा तालुके अध्यक्ष, पदाधिकारी हे दहा हजार कार्यकर्त्यांसमोर १२ नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे पोहोचणार आहेत. हे सर्व कार्यकर्ते कोल्हापुरी फेटा बांधून तेथे जाऊन कोल्हापुरी बाणा दाखवून देतील. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून दहा ते पंधरा हजार कार्यकर्ते यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा- काँग्रेस आमदारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले, “मला असं म्हणायचं होतं की…”

देशातील परिस्थिती अत्यंत बिकट असून एकमेकांविषयीची विश्वासार्हता कमी होत चालली आहे. अर्थविषयक कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकार स्वतःकडे काही अधिकार घेण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही संपवण्याचे हे धोरण आहे. त्यामुळे लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी राहुल गांधी काढत असलेले यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे, असेही पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satej patil on chandrakant khaire statement regarding congress mla dpj