महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच एकनाथ शिंदे यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा नाकारण्यात आली, असा गंभीर आरोप शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. कांदे यांच्या आरोपाला माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी दुजोरा दिला आहे. सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं भुसे यांनी म्हटलं आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवण्यात आली नाही, असं म्हणत दादा भुसे यांनी सुहास कांदे यांच्या आरोपांना दुजोरा दिला आहे.
बंडखोर आमदारांकडून होणाऱ्या या आरोपांना आता तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सतेज पाटील यांनी संबंधित सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, “शंभुराजे देसाई असो वा मी, एखाद्या व्यक्तीला संरक्षण देण्याबाबतचा निर्णय आम्ही घेत नाही. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असते, संबंधित व्यक्तीला धोका आहे का? याचं विश्लेषण केलं जातं. धोका असल्यास एसआयटीकडून अहवाल दिला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीला संरक्षण पुरवलं जातं.”
हेही वाचा- पाठीत खंजीर कुणी खुपसला? रामदास कदम यांचं आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
“यामध्ये मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नाहीत. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असल्याने धोक्याचं विश्लेषण झाल्यानंतर त्यांना योग्य वाटेल, अशा व्यक्तींना संरक्षण पुरवली जाते. त्यामुळे एकनाथ शिंदेंना संरक्षण पुरवू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांकडून गेल्या असतील, असं मला वाटत नाही. कारण त्यावेळी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. त्यामुळे त्यांना सुरक्षा देऊ नका म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याउलट ते गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना वाढीव सुरक्षा पुरवली जाते. पोलीस खातंदेखील त्यांची विशेष काळजी घेतं. म्हणून मला या गोष्टीत काही तथ्य वाटत नाही” असं सतेज पाटील म्हणाले.
सुहास कांदे यांनी काय आरोप केले?
“ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्यावेळी दोन्ही गृहमंत्र्यांनी (राज्य आणि कॅबिनेट) त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा विचार केला होता. पण उद्धव ठाकरेंनी सकाळी साडेआठ वाजता शंभूराज देसाई यांना फोन करून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं,” असा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. तसेच एक मराठी माणूस नक्षलवाद्यांविरोधात लढत असताना त्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असूनही सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? जे हिंदुत्वाच्या विरोधात होते त्यांना झेड प्लस सुरक्षा का देण्यात आली? असे प्रश्नही कांदे यांनी उपस्थित केले आहेत.