बीड पोलिसांनी गुरुवारी आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक केली असून शुक्रवारी सकाळी त्याला बीडमध्ये आणण्यात आलं. एकीकडे त्याची अटक झाली असताना दुसरीकडे बीडमधील वनविभागाच्या एका जमिनीवर बांधण्यात आलेलं त्याचं मोठं घर आणि घराला लागून असणारं कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आलं. त्यामुळे आरोपी वा गुन्हेगारांच्या घरांवर पाडकाम कारवाई होत असल्याचं दिसत असताना खोक्या भोसलेच्या बहिणीनं उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.

सतीश उर्फ खोक्या भोसलेनं एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांनी सतीश भोसले आपलाच कार्यकर्ता असल्याचं मान्य केलं. मात्र, त्याच्यावर कायद्यानुसार जी काही कारवाई आहे ती व्हावी, अशी स्पष्ट भूमिका धस यांनी मांडली.

सुरेश धस यांच्या प्रतिक्रियेनंतर सतीश भोसलेचा शोध बीड पोलिसांकडून घेतला जाऊ लागला. स्थानिक न्यायालयासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी गेलं असता “वृत्तवाहिन्या आरोपीच्या मुलाखती घेत असताना पोलिसांना सतीश भोसले कसा सापडत नाही?” असा सवाल न्यायालयाने केला.

यादरम्यान, खोक्या भोसले प्रयागराजमध्ये असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार बीड पोलिसांनी प्रयागराज पोलिसांच्या मदतीने सतीश भोसलेला प्रयागराजमधून गुरुवारी अटक केली. त्याला शुक्रवारी सकाळी विमानाने औरंगाबादला आणण्यात आलं. तिथून त्याला घेऊन पोलीस बीडला रवाना झाले. यादरम्यान, सतीश भोसलेचं बीडमधील अतिक्रमित जागेवर बांधलेलं घर बुलडोझरने पाडण्यात आलं.

“आम्हाला समजलं की त्यांची घरं पेटवून दिली”

दरम्यान, खोक्या भोसलेच्या बहि‍णीने माध्यमांशी बोलताना उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. “सतीश भोसले माझा भाऊ आहे. मी या प्रकरणात आजपर्यंत आले नव्हते. त्याची जी काही चौकशी चालू आहे ते आम्ही मोबाईलवर पाहात होतो. जो काही अन्याय होतोय तो खरा आहे का खोटा वगैरे कळेलच. पोलिसांची चौकशी चालू आहे. ही कायदेशीर चौकशी आम्हाला मान्य आहे. पण बुलडोझरने त्यांचं घरं पाडलं गेलं. त्याच्या २-४ तासांनी असं समजलं की त्यांची घरं पेटवून दिली आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.

“आम्हाला रात्री समजलं, आम्ही सकाळी सगळं बघितलं आणि ताबडतोब इथे आलो. त्यांचं घरदार पाडण्यात आलं आहे. लहान मुलींना मारहाण झाली आहे. त्यांच्यावर बीडच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांना बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहेत. आमची विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या. हे सगळं करणाऱ्या लोकांना अटक करा”, अशी मागणीही त्यांनी केली आहे.