पीटीआय, मुंबई
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ ‘खोक्या’ याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्याला बीडमध्ये आणले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
प्रयागराज येथे ‘खोक्याला’ अटक करण्यासाठी गेलेले बीड पोलिसांचे पथक सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले. यानंतर त्याला रस्तेमार्गाने बीड येथे आणण्यात आले. वैद्याकीय तपासणीनंतर त्याला शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. खोक्याविरोधात बीड पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह अन्य तीन गुन्ह्यांची नोंद केली आहे.
सतीश भोसलेने शिरूर येथील वन विभागाच्या जागेवर बेकायदेशीररीत्या बांधलेले निवासस्थान गुरुवारी अधिकाऱ्यांनी पाडले. गुन्हेगारीव्यतिरिक्त त्याच्याविरोधात वन कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, घरावर तोडक कारवाई झाल्यानंतर अज्ञातांनी घराला आग लावली, त्याचबरोबर आमच्यावर हल्ला केल्याचा दावा भोसलेच्या नातेवाईकांनी केला आहे.