सातारा : खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी तलावात रोहित (ग्रेटर फ्लेमिगो) पक्ष्यांचे आगमन झाले आहे. रोहितसह पट्टेरी राजहंस, पोचार्ड, पिंक टेल आणि इतर ५० हून अधिक स्थलांतरित प्रजातींचे आकर्षक पक्षी दाखल झाल्याने पक्षीप्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. सुरक्षित नैसर्गिक अधिवास आणि सशक्त अन्नसाखळी उपलब्ध झाल्याने यावर्षी परदेशी पाहुणे वेळेवर दाखल झाले आहेत.
दरवर्षी या तलावावर कडाक्याच्या थंडीत रोहित पक्ष्यांचे आगमन होत असते. मात्र, गेल्या काही वर्षांत हवामानात झालेले बदल, खटाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, नैसर्गिक अन्नसाखळी आणि अधिवासाला पोहचलेली बाधा यामुळे या पक्ष्यांचे आगमन वेळेवर होत नव्हते. २०२३ मध्ये तर अगदी पावसाळ्यात ऑगस्टमध्ये रोहित पक्ष्यांचे आगमन झाले होते. यावर्षी मात्र चांगला पाऊस झाल्याने तसेच खटाव तालुक्यातील विविध तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झाल्याने परदेशी पाहुण्यांच्या आगमनाला पोषक वातावरणनिर्मिती झाली आहे.पांढरे शुभ्र आणि त्यावर लालछटा असलेले पंख, लांब गुलाबी पाय असे हे शेकडो रोहित पक्षी सध्या हजारो किलोमीटरचा प्रवास करून सूर्याचीवाडी तलावावर दाखल झाले आहेत.
हेही वाचा…Microsoft चे सीईओ सत्या नडेलांनी केलं कौतुक, शरद पवारांनी मानले आभार; नेमकं काय घडलं?
दरवर्षी सर्वात मोठ्या येरळवाडी तलाव परिसरात मोठ्या संख्येने फ्लेमिंगो येतात. यंदा मात्र येरळवाडी तलावात अद्यापही मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा आहे. परदेशी पक्ष्यांसाठी आवश्यक असणारी दलदल निर्माण झाली नसल्याने फ्लेमिंगो अद्याप येरळवाडीत आले नाहीत, मात्र अन्नसाखळीला अनुकूल परिस्थिती असल्याने परदेशी पाहुण्यांनी सूर्याचीवाडीत मुक्काम ठोकला आहे. रोहित पक्ष्यांसह पट्टेरी राजहंस, पोचार्ड, पिंक टेल, बदकांच्या विविध प्रजाती आणि अनेक प्रकारचे आकर्षक छोटे पक्षी येरळवाडी आणि सूर्याचीवाडी परिसरात दाखल झाले आहेत. यावर्षी वेळेवर फ्लेमिंगो दाखल झाल्याने पक्षीप्रेमी चांगलेच सुखावले आहेत.
हेही वाचा…साताऱ्यात उद्यापासून ‘शोध मराठी मनाचा’संमेलन, शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
येरळवाडी, सूर्याचीवाडी हे परदेशी पक्षांच्या विविध प्रजातींचे पक्षी आणि पक्षीप्रेमींसाठी महत्त्वाचे स्थळ ठरत आहेत. या भागातील जैवविविधता संरक्षित असल्याचे हे द्योतक आहे. सध्या या भागात १०० हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती पहायला मिळत आहेत. ‘ई बर्ड’वर तशी नोंद करण्यात आली आहे. डॉ. प्रवीणकुमार चव्हाण, पक्षी अभ्यासक