नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सत्यजित तांबे आणि शुंभागी पाटील यांच्यात थेट लढत झाली असून निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे अनेकांचे लक्ष आहे. मात्र सत्यजित तांबे यांना निवडणुकीच्या निकालाआधीच एक धक्का बसला आहे. तांबे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि नाशिक पदवीधर निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणारे नाशिक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे काल रात्री अपघाती निधन झाले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्यांला श्रद्धांजली व्यक्त केली आहे. तर फेसबुक, ट्विटरवर अनेकजण मानस पगारच्या अपघाती निधनाबाबत दुःख व्यक्त करत आहेत.
आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार होता. त्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक येथे जात असताना हा अपघात घडला. नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर लोकांवर उपचार सुरु आहेत.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात तांबे-पाटील यांच्यात आज मुख्य लढत
काय म्हणाले सत्यजित तांबे?
सत्यजित तांबे यांनी ट्विट करत लिहिले की, “माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे.” सत्यजित तांबे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यापासून मानस पगार त्यांच्यासोबत होते. सत्यजित तांबे यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात त्यांची खंबीर साथ होती. आता देखील नाशिक पदवीधर निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्यानंतर मानस पगारने सोशल मीडियावर तांबे यांची बाजू उचलून धरली होती.
कोण होते मानस पगार?
मानस पगार हे काँग्रेस पक्षाचे नाशिकचे युवक जिल्हाध्यक्ष होते. काँग्रेसमध्ये येण्याच्या आधीपासून पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारांसाठी त्यांनी काम सुरु केले होते. युथ फॉर डेमोक्रसी या संघटनेच्या माध्यमातून सेक्यूलर विचारांना अधिक युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते. तसेच काँग्रेस पक्षाची सोशल मीडियावरील बुलंद तोफ म्हणूनही त्यांची ओळख होती. भाजपाकडून करणाऱ्या येणाऱ्या आरोपांना, दाव्यांना पुराव्यासहीत खोडून टाकण्याचे प्रसंगी प्रतिवाद करण्याची भूमिका मानस घेत असत. त्यांच्या लिखाणामुळे अनेक तरुण काँग्रेससोबत जोडले गेले होते.
सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांची बाजू सोशल मीडियावर जोरकस मांडण्याापसून ते प्रचारासाठी लिखाण करेपर्यंत अनेक जबाबदाऱ्या मानस पगार सांभाळत होते.