गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रुपाने निर्माण झालेलं वादळ अखेर गुरुवारी सत्यजीत तांबेंच्या विजयानं शमलं. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्यावरून सत्यजीत तांबे आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले. सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे मविआनं शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, जवळपास दुप्पट मतं मिळवत सत्यजीत ताबेंनी शुभांगी पाटील यांचा पराभव केला. यानंतर माध्यमांशी बोलताना सत्यजीत तांबेंसह त्यांची मुलगी अहिल्याही उपस्थित होती. यावेळी तिने दिलेली बोलकी प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.
विजयानंतर काय म्हणाले सत्यजीत तांबे?
गुरुवारी रात्री उशीरा नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये विजय मिळवल्यानंरतही आपण सेलिब्रिशन करणार नाही, असं तांबेंनी जाहीर केलं. “माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय. त्यामुळे कोणताही आनंदोत्सव साजरा करणार नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा”, असं सत्यजीत तांबेंनी ट्वीट करून नमूद केलं होतं.
“मतांची टक्केवारी कमी झाली. सोमवारचा दिवस होता, वर्किंग डे होता. अनेक लोक मतदानासाठी येऊ शकले नाहीत. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मतं आहेत. पण मिळालेल्या यशामुळे आम्ही समाधानी आहोत. आमच्या परिवाराने कायम राजकारण निवडणुकीपुरतं केलं आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम आम्ही केलं आहे. पुढची भूमिका काय असेल, याविषयी मी ४ तारखेला सविस्तर बोलेन”, असंही सत्यजीत तांबे टीव्ही ९ शी बोलताना म्हणाले.
सत्यजीत तांबेंच्या मुलीची प्रतिक्रिया!
सत्यजीत तांबेंच्या विजयावर त्यांचे सहकारी आणि कार्यकर्त्यांकडून जशा शुभेच्छा देण्यात येत आहेत, तशाच शुभेच्छा त्यांची मुलगी अहिल्या तांबे हिनंही आपल्या वडिलांना दिल्या आहेत. पण या शुभेच्छा तिनं तिच्या वयाला अनुसरून दिल्यामुळे त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. “मला खूप आनंद होत आहे. माझे बाबा फार मेहनत करतात. माझ्यासाठी माझे बाबा सुपर हिरो आहेत”, असं अहिल्या म्हणाली आहे.
दरम्यान, सत्यजीत तांबेंना भाजपानं प्रवेशाची खुली ऑफर दिलेली असतानाच काँग्रेसकडून त्यांच्या घरवापसीसंदर्भात सूचक विधानं करण्यात आली आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार? याविषयी सत्यजीत तांबे ४ तारखेला काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.