सावरकर यांची विज्ञाननिष्ठा विज्ञानवाद्यांना पचली नाही. त्यांची हिंदुत्वनिष्ठा अजून समजलेली नाही. कारण, ती कुठल्याही पूर्वसुरींच्या मालिकेतली नाही. म्हणून सावरकरांविषयीचा अभ्यास व्यापक प्रमाणावर होत नसल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाठक यांनी व्यक्त केली. ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्यातर्फे येथे आयोजित रौप्य महोत्सवी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे शुक्रवारी उद्घाटन झाले. त्याप्रसंगी संमेलनाध्यक्षपदावरून ते बोलत होते.
गंगापूर रस्त्यावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहित्य नगरीत आयोजित संमेलनास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, २४ व्या संमेलनाचे अध्यक्ष विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर, अभिनेते शरद पोंक्षे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय बोरस्ते, सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकरराव गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी पाठक यांनी सावरकरांच्या साहित्याचा आवाका अफाट असल्याचे नमूद करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रज्ञा व प्रतिभा या उभयता सुखेनैव नांदत असल्याचे सांगितले. आजच्या ‘आयकॉन’च्या जागतिकीकरणाच्या काळात सावरकर महत्त्वाचे ठरतात. अभ्यासू वृत्ती, ज्वलंत राष्ट्रनिष्ठा व हिंदुत्व यात सावरकरांचे वेगळे पण अर्थपूर्ण स्थान आहे. आजही सावरकरांचा विज्ञानवाद आणि राष्ट्रवाद समाजास पचलेला नाही. निबंध म्हणजे आत्मचरित्रातील विचारांचा विकास अशी त्यांची धारणा होती. सनातन्यांचा आणि सुधारकांचा त्यांनी यथेच्छ समाचार घेतला. सामाजिक क्रांती राजकीय क्रांतीला पूरक असते. राजकीय क्रांती टिकवायची असेल तर सामाजिक क्रांतीचा आधार असणारा समाज एकजिनसी असावा लागतो. हा सावरकरांचा विचार आजही अभ्यासकांना शिरोधार्य वाटतो. सावरकरांनी धर्मभोळेपणाचा खरपूस समाचार घेतला. प्रमाणनिष्ठा व प्रयोगशील विज्ञान आमच्या राष्ट्राचा नवा वेद झाला पाहिजे, अशी त्यांची सुस्पष्ट धारणा होती. खुळचट धर्मविधी मिटविले पाहिजेत, असेही ते स्पष्टपणे सांगत. विज्ञानात प्रत्येक गोष्टीच्या योग्यायोग्यतेची पारख करता येते. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन येतो. विज्ञाननिष्ठ माणसाला आपले कर्तव्य पोथीनिष्ठ माणसापेक्षा अचूकपणे ठरविता येते. यंत्र ही विज्ञानाची मूर्ती असून ते मनुष्यास अतिमानुष  करणारे वरदान आहे, अशा शब्दात सावरकरांनी यंत्राचा गौरव केल्याचे पाठक यांनी सांगितले. सावरकरांनी भाषाशुद्धी व लिपीशुद्धीवर केलेले लेखन आजही महत्त्वाचे आहे. सावरकरांपाशी भाषा आणि विचार होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तत्पर्वी, पोंक्षे यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत सावरकर यांना अद्याप भारतरत्न न दिल्याबद्दल खंत व्यक्त केली. यश आणि श्रीमंतीची व्याख्या काय तर, राजकीय मंडळींची दिवाळखोरी, असे सांगत त्यांनी त्यास काही अपवाद असल्याचे नमूद केले. शालेय शिक्षणात भारताचा इतिहास शिकविण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना इतिहास रंजकपणे शिकविला जात नाही. आज कुठल्याही समस्येवर सावरकर हे एकच उत्तर असल्याचे मत पोंक्षे यांनी व्यक्त केले. अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविकात सावरकर प्रेमींची फौज निर्माण करावयाची असल्याचे सांगितले. संमेलनात योग्य तो सन्मान मिळाला नसल्याची खंत व्यक्त करत सावरकर साहित्य अभ्यास मंडळाने नाराजी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा