आयुर्वेद शाखेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आरोग्य रक्षणाचे कार्य मला करता आले नाही, पण जलसंरक्षणाच्या कामातून मी एकप्रकारे आरोग्यरक्षणच केले याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया स्टॉकहोम जल पुरस्काराचे यंदाचे मानकरी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केले.
राजस्थानातील वाळवंटाचे नंदनवन करून ‘जोहडवाले बाबा’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या राजेंद्रसिंह यांचा जलसंवर्धन, जलसाक्षरता तसेच नद्यांचे शुद्धीकरण अशा कामांच्या निमित्ताने महाराष्ट्राशीही निकटचा संबंध आहे. नोबेल पारितोषिकाच्या तोडीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यात सुनीलभाई जोशी, प्रा. विजय दिवाण, लेखिका सुरेखा शहा आदींचा समावेश आहे. सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनीही जलनायकाचे अभिनंदन केले.
या पाश्र्वभूमीवर आपली प्रतिक्रिया देताना डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, की ‘आव्हानांचा स्वीकार करणे हा आपला स्वभाव आहे. राजस्थानात जलसंवर्धनाचे मोठे काम उभे राहिले, हा त्याचाच एक भाग होय. पण आता जगाला पाण्याच्या युद्धापासून वाचविणे, हे आपले ध्येय आहे. अशा वेळी मिळालेला पुरस्कार आणि झालेला सन्मान हाती घेतलेल्या कामाला बळ देणारा आहे.
ते म्हणाले, भारतात जल संरक्षण कायदा व्हावा यासाठी सर्वाना एकत्र आणण्याचे काम मी सध्या करत आहे. पाण्याने जनतेला जोडून घेणे या मोहिमेत संजयसिंह, सुनीलभाई जोशी यांच्यासह शेकडो साथीदार मेहनत व निष्ठेने कार्यरत आहेत. या कार्यात देशातील अनेक संघटनांना जोडण्याचा प्रयत्न सुरू असून देशात जेथे जेथे पाण्याचे संकट आहे, त्या भागाला ‘पाणीदार’ बनविणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भातील दुष्काळी भागातील जमिनीचे रिकामे पोट भरण्यासाठी काम करावे लागणार असून, त्यासाठी मी व माझे सहकारी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गेल्या ३० वर्षांतल्या अथक कामातून राजेंद्रसिंह यांनी ७ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयोग यशस्वी केला. त्यांच्या या योगदानाची पुरस्कार देताना नोंद घेतली गेली. एक माणूस किती मोठे काम करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे राजेंद्रसिंह होय. त्यांना पुरस्कार मिळाला, ही राजस्थानच्या दृष्टीने नव्हेतर भारताच्या दृष्टीनेही गौरवाची बाब होय, अशी प्रतिक्रिया जोहड कादंबरीच्या लेखिका सुरेखा शहा यांनी व्यक्त केली.
स्टॉकहोम जल पुरस्काराची सुरुवात १९९१ मध्ये झाली. तिसऱ्या वर्षी म्हणजे १९९३ मध्ये डॉ. माधव आत्माराम चितळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर २००५ मध्ये सुनीता नारायण यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. २००९ मध्ये डॉ. बिंदेश्वर  पाठक आणि त्यांच्यानंतर हा पुरस्कार मिळविणारे डॉ. राजेंद्रसिंह राणा हे चौथे भारतीय मानकरी आहेत.

Story img Loader