जंगलभ्रमणात अख्खे आयुष्य घालवितानाच अनुभवलेल्या निसर्गाचे विलोभनीय पैलू साध्या-सोप्या भाषेत खुले करून देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली उद्या, १२ नोव्हेंबरला सहस्त्रचंद्रदर्शनाने ८१ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धात थकलेले शरीर आणि मधुमेहाशी लढाई लढणाऱ्या या अरण्यऋषीचा ऐंशीव्या वर्षांतही ‘वनलोभी’पणा मात्र सुटलेला नाही. प्राणीकोश निर्मितीच्या कामात त्यांनी स्वत:ला पूर्णपणे गुंतवून घेतले आहे. त्यांचे माहिती संकलन, लेखनाची बैठक यात खंड पडलेला नाही. नवनिर्मिती आणि संदर्भाचा ध्यास घेतलेले आणि वृद्धत्वाचा कुठलाही बाऊ न करता अहोरात्र लेखनात गढलेल्या मारुती चितमपल्ली यांचे मन आजही ‘चैत्रपालवी’एवढेच ताजे टवटवीत आहे.
आधुनिकतेच्या हव्यासात निसर्गाला गमावू नका, या एकाच ध्येयाने अरणऋषी भारलेला आणि येणाऱ्या पिढीला सातत्याने जंगले टिकवण्याचा संदेश देत आहे. आयुष्यात आता काहीही मिळवायचे राहिलेले नाही. निसर्ग वाचवा, पक्ष्यांना स्वच्छंदपणे बागडू द्या, चिमण्यांना जपा, एवढेच मागणे आहे.. ‘लोकसत्ता’शी बोलताना हा अरण्यऋषी किंचित भावुक झाला होता..
आयुष्याची जवळजवळ साडेसहा दशके जंगलात काढणाऱ्या मारुती चितमपल्लींनी वन्यजीवांचे वैविध्य, त्यांच्या सवयी, त्यांची वर्तणूक या विषयी लिहिले आहे. त्यांच्या जंगलवर्णनांनी अनेकांना वेड लावले. वन खात्यात नोकरी करताना असंख्य जंगलांचे भ्रमणानुभव, रानकुत्र्यांचे सूक्ष्म निरीक्षण, माकडांची दैनंदिनी आणि जगविख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या साथीने केलेला पक्ष्यांचा चौफेर अभ्यास ही चितमपल्लींची वैशिष्टय़े.. विदर्भ, महाराष्ट्रातील अवघी जंगले अक्षरश: पायाखालून घालताना मारुती चितमपल्ली यांना कधी थकवा जाणवला नाही. त्यांची जंगलप्रदेशांवरील बळकट पकड लेखणीतील सहजवाक्यांमधून मनाचा ठाव घेत राहिली. जंगलाशी निगडित साहित्य निर्मिती करणाऱ्याला अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे, ही त्यांच्या साहित्यकृतीवरील मोहर होती.
विशेषत: एखादा कोश निर्माण करणे हे सामूहिक काम असले तरी मारुती चितमपल्ली यांचा ‘पक्षिकोश’ हा एकहाती तयार झालेला आहे आणि हे सत्य आहे. पक्ष्यांच्या प्रजातींचे माहिती संकलन, संशोधन, त्यांचा अभ्यास, संबंधित भागात फिरून त्याच्याविषयीची अतिरिक्त माहिती, स्थानिक ओळख आणि यातून केलेली कोशाची स्वनिर्मित मांडणी हेच अरण्यऋषीचे निर्माण आहे. वयोमानामुळे मारुती चितमपल्ली सध्या नागपुरातील घरीच कन्येसमवेत असतात. त्यांचे पूर्वीसारखे फारसे कुठे जाणे-येणे होत नाही. त्यांच्यासोबत सावलीसारखा राहणारा अमोल खंते हा त्यांची सेवा करतो आहे. अबोल परंतु, तेवढय़ा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा हा वन अभ्यासक जुन्या आठवणीत कधीकधी हरवून जातो. माधवराव पाटील डोंगरवार यांच्याशी असलेली घनिष्ट मैत्री आणि त्यांच्यासमवेतचे ते आनंदी क्षण आठवताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात. सकाळी सुरू झालेला प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी नवा आहे. सतत चिंतन, मनन, नोंदी ही दिनश्चर्या आजही तशीच आहे.. उत्तरायुष्यातही रानवाटांवर झपझप चालण्याची ओढ तशीच आहे..
खडतर रानवाटांवर अरण्यऋषीचे आज सहस्त्रचंद्रदर्शन
जंगलभ्रमणात अख्खे आयुष्य घालवितानाच अनुभवलेल्या निसर्गाचे विलोभनीय पैलू साध्या-सोप्या भाषेत खुले करून देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली उद्या, १२ नोव्हेंबरला सहस्त्रचंद्रदर्शनाने ८१ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत.
आणखी वाचा
First published on: 12-11-2012 at 01:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Save nature