ऊर्जा अर्थात विजेचे महत्त्व अनन्यसाधारण असून देशाच्या प्रगतीसाठी ऊर्जेची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु ऊर्जेची निमिर्ती व मागणी यामध्ये तफावत येत असल्यामुळे ऊर्जेचा तुडवडा जाणवू लागला आहे. यावर काही अंशी मात करण्यासाठी ऊर्जेची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. ऊर्जेची बचत हीच ऊर्जेची निर्मिती असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले.
आंबराई उद्यान येथे राष्ट्रीय ऊर्जा दिनानिमित्त सांगली महावितरण कंपनीने ऊर्जा सप्ताहाच्या सांगता समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऊर्जा बचत रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या वेळी विद्युत विभाग, कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता एस.डी. शिंदे, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचे संचालक गौतम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड पुढे म्हणाले,की प्रत्येक व्यक्तीने ऊर्जा बचत करणे हे आपले प्रथम कर्त्यव्य आहे असे मानून छोटय़ा छोटय़ा गोष्टीपासून ऊर्जा बचत केली पाहिजे. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा दर्जा तपासून त्याप्रमाणे वस्तुंचा वापर केला पाहिजे. विजेचे बचत केल्यामुळे हीच वीज शेती उद्योगधंद्यांना वापरता येऊ शकेल, असे सांगून जिल्हाधिकारी गायकवाड पुढे म्हणाले, महावितरण कंपनीने ऊर्जा बचतीचे महत्त्व कळण्यासाठी प्रबोधन करावे. याची सुरुवात म्हणून, जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामध्ये जाऊन ऊर्जा बचतीचे महत्त्व सांगावे. त्याचप्रमाणे गृहनिर्माण करण्याऱ्या संस्था, बांधकाम व्यावसायिक यांनी नसíगक प्रकाशाचा व ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग होण्याऱ्या घरांची निर्मिती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन करुन महावितरण कंपनीने ऊर्जा बचतीचे महत्त्व सर्वदूर पसरविण्यासाठी ऊर्जा बचत या विषयावर स्पर्धाचे आयोजन करावे, अशा सूचनाही शेवटी त्यांनी दिल्या.
प्रास्ताविक भाषणात कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी सांगली जिल्ह्यामध्ये ऊर्जा बचतीसाठी सुरु असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती देऊन महावितरण कंपनीद्वारे सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता एस.डी. शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, राज्यामध्ये २ कोटी ६० लाख वीज ग्राहक आहेत. कोल्हापूर परिमंडळात विजेचा व सोयी सुविधांचा योग्य रितीने पुरवठा करण्यात येत असून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यावर कंपनीने भर दिला असल्याचे सांगितले.
प्रारंभी शांतिनिकेतन लोक विद्यापीठ, सांगली येथून ऊर्जा बचत रॅलीची सुरुवात झाली. ही रॅली पुढे पटेल चौक, राजवाडा चौक, काँग्रेस भवन, आपटा पोलीस चौकी, कॉलेज कॉर्नर, आंबराई उद्यानामध्ये संपली. या रॅलीमध्ये विविध शाळा, महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता.
या वेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते सांगली शहराचे कनिष्ठ अभियंता एन. वाय. मुजावर यांनी लिहिलेल्या ‘ शिदोरी सुरक्षेची ‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थितांना मुख्य अभियंता एस.डी. शिंंदे यांनी ऊर्जा बचतीची शपथ दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा