ग्रंथालय, शिक्षण, आरोग्य, समाजकार्य, साहित्य, सांस्कृतिक, अशा विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्री-पुरुषांना येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारे या वर्षांचे ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.
यंदा या पुरस्काराचे १२ वे वर्ष आहे. या वर्षी हा पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्या व दलित, आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने काम करीत असलेल्या रूपा साळवे, सर्व शिक्षा अभियान व ज्ञान विज्ञान, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच पुरोगामी चळवळीत कार्य करणारे ज्येष्ठ नेते प्रा. जयप्रकाश म्हात्रे व सुशीला म्हात्रे, खगोलशास्त्र, ज्ञान, विज्ञान प्रसाराचे कार्य करीत असलेले लेखक डॉ. निवास पाटील व डॉ. अमृत कुंवर, ग्रामीण भागातील शेती, शिक्षण आणि समाजप्रबोधनासाठी कार्य करणारे रघुनाथ बोरसे व इंदुमती बोरसे, जातीअंतासाठीच्या आणि सामाजिक समतेच्या चळवळीतील कार्यकर्ते व बालसाहित्य लेखिका सुवर्णा पवार व गोरख पवार यांना देण्यात येणार आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते आणि वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या उपस्थितीत तीन जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व रोख रक्कम दोन हजार रुपये असे आहे. या पूर्वी हा पुरस्कार डॉ. गेल ऑमवेट, शांताबाई रानडे, रूपाताई कुलकर्णी, मेहरुन्निसा दलवाई, उषा वाघ, शाहीर केशरबाई चाँद शेख, गोविंद पानसरे व उमाताई पानसरे, मीना शेसू, प्राजक्ता दमिष्टे आणि प्रा. डॉ. यशवंत सुमन आदी मान्यवरांना देण्यात आला आहे.
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील बांधीलकीच्या भावनेतून काम करणाऱ्या या समाज बदलाचे स्वप्न पाहणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती वाचनालयाचे सचिव शिवाजी लांडे, प्राचार्य सरोज जगताप, प्रा. विवेक खरे आदींनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा