शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष, माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, आमदार दीपक केसरकर, माजी खासदार एकनाथ ठाकूर यांची लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भूमिका अद्याप ठरली नसल्याने निवडणूक प्रचार रणधुमाळीत रंगत अद्याप आली नाही.
काँग्रेसचे माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांना मानणारा सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात एक गट होता व आहे, पण आज ते शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असले तरी जिल्ह्य़ातील त्यांना मानणारे गटातील काहीजण काँग्रेसमध्ये आहेत, तर काहीजण तटस्थ आहेत. सुधीर सावंत यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनी कोणत्याही परिस्थितीत नारायण राणे यांना मदत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. साखर कारखान्याला विरोध करत तक्रारी राणे व त्यांच्या समर्थकांनी केल्या आहेत. त्यामुळे आमदार सावंत यांनी भूमिका जाहीर केली. दरम्यान शिवसेनेचे उमेदवार आमदार विनायक राऊत यांनी आमदार विजय सावंत यांची कणकवलीत भेटही घेतली आहे. त्यामुळे तो एक चर्चेचा विषय बनला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनी सुरुवातीला काँग्रेस व आता राष्ट्रवादीत सुमारे २५ ते ३० वर्षे काम केले आहे. त्यांना दोन्ही पक्षांत मानणारा एक गट आहे. मध्यंतरी नारायण राणे यांच्या विरोधात त्यांनी गंभीर आरोप करत टोकाची भूमिका घेतली आहे, पण निवडणूक रणधुमाळीत ते मौनव्रत धारण केल्याप्रमाणे गप्प आहेत.
आमदार दीपक केसरकर यांची नेमकी भूमिका उघड झालेली नाही, ते मौनी भूमिकेत राहिल्याने त्यांना मानणारा एक गट चलबिचल झाला आहे. त्यांची भूमिका राणेंना मदत करणारी आहे किंवा कसे? हे लवकरच उघड होईल पण सध्या तरी आमदार दीपक केसरकर चक्रव्यूहात अडकले आहेत.
काँग्रेस नेते नारायण राणे यांची उघड नाराजी ओढवून घेणाऱ्या आमदार केसरकर यांनी मनोमीलन करून राणेंना मदत करण्याचा निर्णय घेतला तर राजकीय पक्षात वेगळाच ठसा उमटेल. आमदार केसरकर यांना अनेकांची मने दुखवावी लागतील अशी चर्चा आहे. राणे यांच्यावर दहशतवादाची टीका करत खरपूस समाचार घेणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीत निश्चितच उलटसुलट चर्चा घडेल असे सांगण्यात येते.
माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी अद्याप शिवसेनेच्या प्रचारात प्रवेश केला नाही. ते शिवसेनेच्या प्रचारात उतरतील अशी अटकळ बांधली जात आहे. केंद्रीय मंत्री व शिवसेनेचे खासदार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी यापेक्षा त्यांना मानणारा एक मोठा गट या मतदारसंघात आहे. तो शिवसेनेचे उमेदवार आणि विनायक राऊत यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहे किंवा कसे? हे काळच ठरविणार आहे.
शिवसेनेचे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांना मानणारा एक वर्ग आहे. ते सारस्वत बँकेच्या रूपात सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची या मतदारसंघाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार शिवराम दळवी, आमदार किरण पावसकर अशा राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील कोकणातील आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, आमदार अनिल तटकरे, आमदार प्रकाश बिनसाळे अशा आमदारांच्या भूमिकाही  या निवडणुकीच्या निमित्ताने अद्याप स्पष्ट झालेल्या नाही.
राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वाना डॉ. नीलेश राणे यांच्या प्रचारासाठी जुंपणार आहेत, पण स्थानिक कार्यकर्त्यांत, पदाधिकाऱ्यांत असणारी प्रचंड नाराजी ते कशी दूर करणार आहेत ते लवकरच उघड होईल.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपाचे नेते अजूनही दुरूनच रणधुमाळी पाहत आहेत एवढे मात्र निश्चित मानले जाते.