सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. एकेकाळी हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर केसरकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. यापूर्वी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. २००९ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढवली होती. सावंतवाडीतून ते पहिल्यांदा २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपू्र्वी केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.

दीपक केसरकरांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विधानसभेवर निवडून गेलेल्या दीपक केसरकर यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केसरकर यांनी नारायण राणे यांचे पूत्र व काँग्रेसचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांना विरोध केला. ही लढाई नारायण राणे या व्यक्तीविरुद्ध नाही तर राणे या प्रवृत्तीच्या विरोधात आहे असं सांगत आपण राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यावेळी दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले होते. अखेर त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा : Aheri Assembly Constituency : अहेरी विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) धर्मरावबाबा आत्रामांना शह देण्यात यशस्वी ठरणार?

२०१४ व २०१९ मध्ये झालेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील स्थिती

२०१४ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक दीपक केसरकर यांनी शिवसेनेकडून लढवली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार राजन तेली यांचा पराभव केला होता. दीपक केसरकर यांना ७०९०२ मते मिळाली, तर राजन तेली यांना २९७१० मते मिळाली. ४१ हजारांहून अधिक मताधिक्याने केसरकर विधानसभेवर सलग दुसऱ्यांदा निवडून गेले होते.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा व शिवसेनेची युती होती. युतीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाल्याने दीपक केसरकर हे शिवसेनेचे उमेदवार होते. यावेळी राजन तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली. केसकरांना ६९७८४ मते मिळाली, तर तेली यांना ५६५५६ मते मिळाली. केसरकर यांना १३ हजार मतांची आघाडी मिळाली. सावंतवाडीतून ते सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंशी मनोमीलन…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय संपादन केला. लोकसभा निवडणुकीत एकमेकांतील मतभेद बाजूला ठेवून दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आघाडी घेतली. त्यामुळे नारायण राणे व दीपक केसरकर यांचे मनोमीलन पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना सावंतवाडीतून ८५ हजार ३१२ तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना ५३ हजार ५९३ मते मिळाली. राणे यांना सांवतवाडीतून ३१ हजार ७१९ मताधिक्य मिळाले.

हेही वाचा : Haryana Exit Polls: ‘एग्झिट’ पोलमधून विनेश फोगटच्या राजकीय ‘एंट्री’वर शिक्कामोर्तब? आमदारकीचं पदक गळ्यात पडण्याचा अंदाज!

भाजपा नेते राजन तेली यांचा सावंतवाडी मतदारसंघावर दावा

दीपक केसरकर यांनी २०१९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजन तेली यांचा पराभव केला. आता तिसऱ्यांदा राजन तेली निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. केसरकर हे शिवसेना-भाजप महायुतीचे संभाव्य उमेदवार असतील. त्यामुळे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राजन तेली नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. भाजपमध्ये राहून तेली यांनी केसरकर निष्क्रिय असल्याची तसेच त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला न्याय दिला नसल्याची टीका केली. तसेच भाजपाचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडीत भाजपाची संघटना बांधणी हाती घेतली आहे. रवींद्र चव्हाण आणि केसरकर यांचे सूर जुळले नसल्याने महायुतीतील खदखद कायम आहे. भाजप नेते या मतदारसंघावर दावा करत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.

‘आता बदल हवो तर आमदार नवो!’

सावंतवाडी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत एका अज्ञात व्यक्तीने “आता बदल हवो तर आमदार नवो!”, या मथळ्याखाली बॅनर झळकवले आहेत.