ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढवून मिळावा म्हणून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या पाश्र्वभूमीवर सावंतवाडी ते कोल्हापूर या मार्गावरील एस.टी. वाहतूक आज दिवसभर बंद पडली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
कोल्हापूर जिल्ह्य़ातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला आहे. वाहने पेटवून दिली जात आहेत. त्या पाश्र्वभूमीवर गेले दोन दिवस प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
सावंतवाडी-आंबोली-आजरा ते कोल्हापूर मार्गावरून सावंतवाडी डेपोच्या एस.टी. बसेस आज धावल्या नाहीत. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या पुणे, तासगाव, सांगली, कुरुंदवाड, महाबळेश्वर या एस.टी.ही आजऱ्याजवळ थांबविण्यात आल्या.
कोल्हापूर जिल्ह्य़ात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने या मार्गावरील प्रवासी वाहतूक ठप्प होती. या विस्कळीत झालेल्या प्रवासी वाहतुकीमुळे भाऊबीजेला इच्छित स्थळी पोहोचणाऱ्या प्रवाशांचा मोठा तांडा अडून पडला. आजरा या ठिकाणी प्रवासी मोठय़ा प्रमाणात अडकून पडल्याचे सावंतवाडी डेपोत कळताच त्यांना सावंतवाडीपर्यंत आणून सोडण्यात आले. फक्त सावंतवाडी ते आजरा इथपर्यंत प्रवासी वाहतूक करण्यात आली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार रुपये भाव मिळावा म्हणून सुरू झालेले आंदोलनच अधिकच भरडले गेले आहे. त्याचा परिणाम एस.टी. बस प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. ऐन दिवाळी सणात पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांचा त्यामुळे मोठय़ा प्रमाणात खेळखंडोबा उडाला. सारेच प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.

Story img Loader