सावंतवाडी नगर परिषदेने वाढती लोकसंख्या व कॉम्प्लेक्सचा विचार करून नळपाणी योजनेचे नवीन धोरण जाहीर केले, तसेच नवीन इमारत बांधकाम परवानगी देताना बोअरवेल किंवा विहिरीची सक्तीची अट घालावी असा ठरावही मंजूर केला. दरम्यान, शहरालगतच्या ग्रामपंचायती शहर विकास आराखडय़ात घरे बांधण्यास परवानगी देत असल्यास फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
सावंतवाडी शहराची वाढती लोकसंख्या व वाढत्या कॉम्प्लेक्सबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत नळपाणी कनेक्शन देण्याचे धोरण ठरविण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर उपस्थित हते.
शहरात कॉम्प्लेक्स होत आहेत, त्या १२ फ्लॅटच्या कॉम्प्लेक्ससाठी एक व २४ फ्लॅटच्या कॉम्प्लेक्ससाठी दोन कनेक्शने देण्याचा ठराव करण्यात आला.
उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी हा ठराव मांडला. शिवाय नगरपालिकेच्या कर थकीत असणाऱ्यांना परवानगी देताना तसे प्रमाणपत्र घेण्याची सक्ती करण्यात आली आहे.
सावंतवाडी शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करून ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांना पाणी देता येत असल्यास दिले जाईल, पण नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना प्रथम विचार होईल असे नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले.
सावंतवाडी शहरालगत असणाऱ्या कोलगाव, माजगाव व चराठे ग्रामपंचायतींनी नगर परिषद कार्यक्षेत्रात घरांना परवानगी देण्याचे सत्र अवलंबिले आहे. तसे झाल्यास ग्रामपंचायतीवर फौजदारी दाखल करण्याचे धोरण जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार ठरविले जाईल, असे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर म्हणाले.
या बैठकीत गोविंद वाडकर, उमाकांत वारंग, विलास जाधव, आनारोजीन लोबो, अ‍ॅड. सुभाष पणदूरकर यांनी चर्चेत भाग घेतला.