येथील जुन्या मिलाग्रीस चर्चचा वाद राष्ट्रीय महालोक अदालतीत एकमेकांच्या समजुतदारपणाने मिटला. सुमारे ४० वर्षे हा वाद सुरू होता. जुन्या-नव्या इमारतीचा वाद ख्रीस्ती बांधवानी संपुष्टात आणला. त्यामुळे न्यायाधीश खलीद भेंडवडे व न्यायाधीश डी. आर. पठाण यांनी महालोकअदालतीचे महत्त्व सर्वानाच पटविले. शनिवारी सावंतवाडी न्यायालयाच्या आवारात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने महालोकअदालतीचे आयोजन केले होते. यामध्ये ठेवलेल्या वादपूर्व, प्रलंबित प्रकरणे, पोलीस विभाग अशा २६२ प्रकरणांपैकी १५९ प्रकरणे तडजोडीने व समजुतीने निकाली काढण्यात आली. त्यामुळे आठ लाख ९ हजार ४६० रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या ११० केसमधून ४३ हजार रुपयांची दंडात्मक रक्कमदेखील वसुल करण्यात आली. अहंकार सोडल्यास वाद मिटतील असा विश्वास या राष्ट्रीय महालोक अदालतीच्या उद्घाटन प्रसंगी न्यायाधीश भेंडवडे यांनी व्यक्त केला. सर्वानी खटले किंवा वाद एकमेकांच्या समन्वयातून सामंजस्याने मीटवा असे आवाहनदेखील केले. लोकअदालतीत वादपूर्व प्रकरणात सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस जुन्या-नव्या चर्चसंदर्भातील अर्ज मिलाग्रीसचे फादर लायस रॉड्रीक्स यांनी ठेवला होता. हा वाद मिटविण्यासाठी न्यायालयाने जुन्या चर्चच्या ११ जणांना बोलाविले होते. हे प्रकरण अॅड. प्रमोद प्रभू आजगावकर, प्रा. सुभाष गोवेकर, गोविंद वाडकर या पॅनेलसमोर आले. समितीने फादय लायस रॉड्रीक्स, गॉडवीन परेरा, मनवेल डिसील्व्हा, फ्रान्सीस डीसोजा, अॅलेक्स डीमेलो, फेलीक्स लोबो, मिलेट डिसोजा यांच्यासह जुन्या चर्चशी संबंधीत आठ जणांची बाजू ऐकून घेतली. जुन्या चर्चचे नुतनीकरण करण्यास कोणाचाही विरोध झाला नाही. यापुढे जुन्या चर्चबाबत कोणतीही तक्रार असणार नसल्याचे मान्य केल्याने ४० वर्षांपासूनचा वाद मिटला.
यावेळी दिवाणी न्यायाधीश खलीद भेंडवडे, सहदिवाणी न्यायाधीश डी. आर. पठाण, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार सतीश कदम, अॅड. निमा सावंत कवीटकर, अॅड. पुष्पलता कोरगावकर, अॅड. निलीमा गावडे, गटविकास अधिकारी मोहन भोई, अॅड. शाम सावंत, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. विनयकुमार द्वासे, अॅड. अरुण पणदूरकर आदी उपस्थित होते. या लोकअदालतीत अनेक प्रकरणे सामंजस्याने मिटली. लोकन्यायालयाचे खऱ्या अर्थाने महत्त्व सर्वासमोर गेल्याचे न्यायाधीश भेंडवडे म्हणाले.