सुमारे ३० वर्षांनंतर गदिमा व बाबुजींचे गीतरामायण आगळ्यावेगळ्या पद्धतीने येथील बॅ. नाथ पै सभागृहात शुक्रवारी संध्याकाळी निर्मिती ग्रुपने सादर केले. सवेश, साभिनय व नृत्यासह भारतीय व पाश्चात्त्य वाद्यांच्या साथीने १५ गायकांनी सादर केलेल्या गीतरामायणाला उपस्थितांनी दाद दिली. सावंतवाडी नगर परिषद, लायन्स व लायनेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आलेल्या गीतरामायण गीतनृत्याचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यिक हरिहर आठलेकर यांच्या हस्ते करण्यात आला. वेदपाठशाळा प्राचार्य श्री. दीक्षित, दिनकर धारणकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी उपस्थित होते.
गीतरामायणाच्या सादरीकरणातील काही गीतांवर नृत्यदिग्दर्शिका स्नेहल पार्सेकर यांनी भरतनाटय़म्च्या आविष्काराने रंगत आणली. त्यामुळे गीतरामायणाला बदलती नृत्याविष्काराची रामायणातील शैली मिळाली. या गीतरामायणात १५ गायक, दोन निवेदक, सहा वादक, नृत्यासह ३० कलाकारांचा समावेश लाभला, असे निर्मिती ग्रुपचे विनय सौदागर म्हणाले. सर्वाच्या साथीमुळे गीतरामायणातील आनंद व गोडवा प्रेक्षकांना भावेल, असे सादरीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहिला, असे त्यांनी सांगितले.
गीतरामायणातील गीतांवर भरतनाटय़म्सह सवेश, साभिनय व नृत्यासह सादरीकरणात दोन शालेय विद्यार्थ्यांचा वादकांमध्ये असणारा समावेश आनंद देऊन गेला, असे विनय सौदागर म्हणाले.
गीतरामायणात १८ गीतांचे १५ गायकांनी गायन केले. प्रारंभी शेखर पणशीकर यांच्या ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’ने सुरुवात झाली. यानंतर सर्वेश राऊळ व चिन्मय साळगावकर यांनी ‘सरयू तीरावर’, कृष्णा राऊळ यांनी ‘दशरथा घे हे पायसदान’, अपूर्वा सौदागर व अंकिता सावंत यांनी ‘राम जन्मला’ गीतगायन केले. स्नेहा वझे ‘सावळा गं रामचंद्र’, कैदार म्हैसकर ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला’, गौरव पेंडसे ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ऋचा कशाळीकर ‘मोडू नका वचनास’, शेखर पणशीकर ‘नकोस नौके परत फिरू’ यांच्या गीतांनी बहार आणली.
गीतरामायणाच्या या सादरीकरणात अक्षय वाटवे व पियुषा प्रभुतेंडोलकर यांनी सदाबहार सूत्रसंचालन करून कार्यक्रमाचा आनंद खुलवत ठेवला. या आगळ्यावेगळ्या प्रयोगाला सावंतवाडीकरांनी दिलेली दाद व साथ श्रीरामनवमीच्या रामजन्मोत्सव कार्यक्रमाचे गीतगायनाच्या नृत्याच्या आविष्कारातून वैशिष्टय़ ठरले.

Story img Loader